Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशात एका कथित लव्ह जिहादच्या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात मध्य प्रदेशातील एक मुलगी घरातून पळून गेल्याने कथित लव्ह जिहादच्या संशयावरुन एका समुदायाचे लोक दुसऱ्या समुदायाच्या लोकांशी भिडले. काही वेळातच वादाने हिंसक रुप घेतले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी गावात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. जमावाने काही घरे आणि दुकानेही पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागात घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या संपूर्ण परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
सागर जिल्ह्यातील सनोधा भागात दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर हिंसाचार उसळला. यावेळी दुकाने आणि घरे पेटवून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. "आम्हाला सनोधा गावात काही घटनांबद्दल माहिती मिळाली. प्रशासन आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आहे आणि परिस्थिती शांत आहे. पोलीस दल तैनात आहे, तपास सुरू आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही आमची प्राथमिकता आहे," अशी माहिती सागर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप जीआर यांनी दिली.
एका समुदायाच्या तरुणाने हिंदू मुलीचे अपहरण केल्यानंतर हा सगळा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. सनोधा शहरात राहणारी मुलगी कालपासून बेपत्ता आहे. त्याच शहरातील तरुणही कालपासून बेपत्ता आहे. मुलीच्या कुटुंबाचा आरोप आहे की त्याच तरुणाने मुलीला जबरदस्तीने आपल्यासोबत नेले आहे. यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबासह शहरातील लोक रस्त्यावर उतरले. यावेळी मोठ्या प्रमाणात जाळपोळ देखील करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सनोधा गावातील त्या मुलीचे लग्न होणार होते. लग्नाच्या एक दिवस आधी एका मुलाने मुलीचे अपहरण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केली. ही माहिती पसरताच शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी सकाळपासूनच मुलीचे नातेवाईक आणि समाजातील लोक गावात जमले आणि त्यांनी या विरोधात निषेध करण्यास सुरुवात केली. बिघडलेली परिस्थिती पाहून आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातील अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. पोलिसांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त लोकांनी मुलीला शोधून आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली.
मुलीसोबत पळून गेलेल्या मुलाच्या गावात असलेल्या दुकानांना आणि घरांना काही लोकांनी आग लावली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. संपूर्ण गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे. संतप्त लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापरही केला.