गुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे आमची वांशिक ओळख पुसली जाणार असून, १९८५ च्या आसाम कराराचेही उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूरसह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये विविध संघटनांनी मंगळवारी बंद पुकारला होता. काही ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण लागले. बंदमुळे ईशान्य भारतातील रेल्वे, सार्वजनिक वाहतूकसेवा आणि जनजीवनही विस्कळीत झाले.
या विधेयकामुळे नागरिकत्व मिळालेल्यांमुळे आपल्या रोजगारांवर गदा येईल, अशी भीती ईशान्य भारतातील लोकांच्या मनात आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ आॅल आसाम स्टुडंट्स युनियन व ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांची शिखर संघटना दी नॉर्थ ईस्ट स्टुडंट्स आॅर्गनायझेशनने ११ तासांचा बंद पुकारला. आसाममध्ये अनेक ठिकाणी दुकाने, बाजारपेठा, बँका आदी बंद ठेवण्यात आल्या होत्या. गुवाहाटीमध्ये निदर्शक व सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली.
उत्तर रेल्वे मुख्यालय व विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयाची प्रवेशद्वारे बंद करून मार्ग रोखून धरण्याचा प्रयत्नही निदर्शकांनी केला. आसाममध्ये बंदमुळे खाजगी, सार्वजनिक क्षेत्रातील वाहने रस्त्यावर नव्हती. विद्यापीठाच्या सर्व परीक्षा बंदमुळे पुढे ढकलण्यात आल्या.
अरुणाचल, मणिपूरमध्येही प्रतिसाद
अरुणाचल प्रदेशातही कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व शिक्षणसंस्था, व्यापारी आस्थापने बंद होती. सरकारी कार्यालयांत उपस्थिती तुरळक होती. दगडफेकीचे तुरळक प्रकार वगळता बंद तुलनेने शांततेत पार पडला. आॅल अरुणाचल प्रदेश स्टुडंट्स युनियनने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला जोरदार विरोध केला आहे. मणिपूरमध्येही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात मंगळवारी १५ तासांचा बंद पाळण्यात आला. हे विधेयक त्वरित रद्द न केल्यास आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा आॅल मणिपूर स्टुडंट्स युनियनने दिला आहे. राज्यात बाजारपेठा, दुकाने बंद असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा येथील आदिवासी भागांमध्ये हे विधेयक लागू होणार नाही.
तामिळ निर्वासितांचा विचार करा : श्री श्री रविशंकर
चेन्नई : भारतात तीन दशकांपासून राहत असलेल्या श्रीलंकेतील एक लाखापेक्षा अधिक तामिळ निर्वासितांना कायमस्वरूपी भारतीय नागरिकत्व देण्यात यावे, अशी मागणी आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर व प्रख्यात तामिळ गीतकार वैरामुत्तू यांनी केली आहे. तामिळ निर्वासितांचाही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये समावेश करण्यात यावा, असे वैरामुत्तू यांनी म्हटले आहे.
दिल्लीतही निदर्शने : या विधेयकाविरोधात विरोधी पक्ष, विद्यार्थी व सामाजिक संघटनांनी दिल्लीत जोरदार निदर्शने केली. नॉर्थ ईस्ट स्टुंडट्स युनियन व माकपच्या कार्यकर्त्यांनी जंतरमंतर येथे निदर्शने केली. माकपच्या खासदारांनी संसद भवनातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी सोमवारी आपला निषेध प्रकट केला होता. नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझन्स (एनआरसी) व नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात काही सामाजिक संघटनांनीही मंगळवारी धरणे धरले होते.