नवी दिल्ली : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालानंतरही राजकीय तणाव सुरु आहे. निवडणूक निकालात फेरफार झाल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत म्हणजेच कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन जोरदार गोंधळ घातला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेचे जगभरात पडसाद उमटले असून यावर जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेवर भाष्य केले असून हिंसाचाराच्या बातम्या पाहून आपण अस्वस्थ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात नरेंद्र मोदींनी ट्विट केले आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, "वॉशिंग्टन डीसीमध्ये दंगल आणि हिंसाचाराबाबतच्या बातम्या पाहून अस्वस्थ झाले. व्यवस्थित आणि शांततेत सत्ता हस्तांतरण व्हायला पाहिजे. बेकायदेशीर निषेधाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेला डाग लागू दिला जाऊ शकत नाही."
राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडेन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, परिणामी संसदेचे कामकाज थांबवावे लागले. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळही घातला. या घटनेवर देशभरात टीका केली जात आहे.
ट्रम्प यांचे समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहनडोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. आपल्या समर्थकांना शांततेत निषेध करण्याचे आवाहन करीत ट्रम्प म्हणाले की, आंदोलनात कोणतीही हिंसाचार होऊ नये. लक्षात ठेवा आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा पक्षात आहोत.
ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट लॉकनियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट १२ तासांसाठी, तर फेसबुकने २४ तासांसाठी लॉक केले आहे."वॉशिंग्टन डीसीमध्ये उद्भवलेल्या हिंसक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे तिन ट्वीट्स हटवावेत, अशी आमची मागणी आहे. नागरी अखंडत्व धोरणाचे वारंवार आणि गंभीर उल्लंघन त्यांनी केले आहे," असे ट्विटरने म्हटले आहे. ट्विट्स न हटवल्यास डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट लॉक राहील, असेही ट्विटरने स्पष्ट केले आहे.
फेसबुकने हटविला ट्रम्प यांचा व्हिडीओट्विटरनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ फेसबुकने डिलीट केला. दरम्यान, अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले होते. "आम्ही ट्रम्प यांचा व्हिडिओ हटविला आहे, कारण ट्रम्प यांचा व्हिडिओ सुरु असलेल्या हिंसाचार कमी करण्याऐवजी प्रोत्साहन देत होता," असे फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंटीग्रिटी गाय रोसेन यांनी म्हटले आहे.
...हा देशद्रोह आहे - जो बायडेननवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले जो बायडेन (Joe Biden) यांनी ट्रम्प यांना संविधानाची सुरक्षा करण्याचे आवाहन केले आहे. "मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी आपली शपथ पूर्ण करण्यासाठी तात्काळ राष्ट्रीय प्रसारमाध्यमावर जावे आणि संविधानाची सुरक्षा करावी आणि हे सर्व थांबवावे", असे जो बायडेन म्हणाले. याचबरोबर, कॅपिटल बिल्डिंगमध्ये जो गोंधळ आपण पाहिला आहे, ते आम्ही नाही आहोत. ही कायदा न मानणाऱ्या लोकांची खूप कमी संख्या आहे. हा देशद्रोह आहे, असे जो बायडेन यांनी सांगितले.