पुणे : काश्मीर प्रश्न हा खूप नाजूक आहे, त्याबाबतचे निर्णय घेताना खूप सावधानता बाळगली पाहिजे. मात्र, भाजप सरकारच्या प्रसिद्धीच्या मोहापायी काश्मीरमध्ये हिंसाचार वाढत आहे,असा घणाघाती आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी केला. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. स्वैराचाराचे राज्य निर्माण होते त्यावेळी ते कोसळायला वेळ लागत नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ‘‘दहशतवादी अजमल कसाब, अफजल गुरू यांना फाशी दिली जाईपर्यंत त्याची माहिती कुठेही दिली नाही. त्यानंतरही काश्मीरमध्ये योग्य त्या सुरक्षितेच्या उपाययोजना केल्या. मात्र, बुऱ्हाण वाणीच्या प्रकरणात तसे झाले नाही. काश्मीर प्रश्न चर्चेने सोडविला पाहिजे. तिथल्या लोकांशी संवाद साधला पाहिजे. भाजप सरकारच्या काळात सीमेवर घुसखोरी वाढली आहे. दलितांवरील हल्ले वाढले आहेत. सरकार कडक कारवाई करत नाही, त्यामुळे अशा घटना वाढल्या. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये गोरक्षकांना आवर घालण्याची गरज आहे.’’ पंतप्रधान देशाची सुरक्षा, दलित अत्याचार यावर काहीच बोलत नाहीत. यातून जगभर चुकीचा संदेश जात आहे. इसिसचा धोका वाढत असून त्यासाठी विशेष सावधानता बाळगणे गरजेचे आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मी गृहमंत्री असताना माझ्यापर्यंत आला नव्हता, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. भाजप-शिवसेना दोघांना सत्ता हवी आहे, त्यामुळे ही युती तुटण्याची कोणतीही शक्यता नाही. अॅट्रासिटी कायदा गरजेचाच असून त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, असेही शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>महाराष्ट्र अखंड रहावामहाराष्ट्र अखंडच राहिला पाहिजे. अखंड महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्मांनी बलिदान दिले आहे याची आठवण ठेवली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, कोकण यातील प्रादेशिक असमतोल दूर होण्यासाठी लक्ष दिले पाहिजे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
प्रसिद्धीच्या मोहामुळे हिंसाचार
By admin | Published: August 02, 2016 5:16 AM