वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात आंदोलनाला पश्चिम बंगालमध्ये हिंसक वळण लागले आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ आंदोलकांनी दगडफेक करत वाहनांची आग लावत तोडफोडही केली आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूरमध्ये हा हिंसाचार उफाळला आहे.
आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडविला होता. यावेळी पोलीस रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यासाठी आले असता हिंसाचार सुरु झाला. आंदोलकांनी दगडफेक करण्यासा सुरुवात केली. तसेच वाहनांना आगही लावण्यास सुरुवात केली. बहुतांश पोलिसांच्याच वाहनांना नुकसान करण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल पुन्हा एकदा आगीत पेटला आहे. सांप्रदायिक हिंसाचार भडकला आहे. यावेळी मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधार्थ मुस्लिम जमाव रस्त्यावर उतरला आहे. अनैसर्गिक लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि बेकायदेशीर घुसखोरीमुळे पश्चिम बंगाल ममता बॅनर्जींच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे, असा आरोप भाजप नेते अमित मालवीय यांनी केला आहे.
आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवून दिल्या. अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि लाठीचार्ज करावा लागला आहे. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे. परिसरात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाने लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.