मागच्या दीड वर्षांपासून अशांत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिरिबाम जिल्ह्यातील एका नदीमध्ये सहा बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह सापडल्यानंतर काही तासांतच राज्यात हिंसाचार उफाळला आहे. आंदोलकांनी तीन मंत्र्यांसह सहा आमदारांच्या घरांवर हल्ला केला. त्यानंतर राज्य सरकारने पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. तसेच राज्यातील काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राज्यातील परिस्थिती खूपच बिघडली असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
संतप्त आंदोलकांनी आमदारांच्या घरांवर हल्ला केला आहे. त्यात मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या जावयाच्या घराचाही समावेश आहे. हिंसक जमावाने आमदारांच्या घरांची जाळपोळ केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर करावा लागला.
सोमवारीपासून बेपत्ता असलेल्या दोन महिला आणि एका मुलीचा मृतदेह शनिवारी जिरिबाममधील बारक नदीमध्ये सापडला. तर अन्य तिघांचे मृतदेह हे शुक्रवारी रात्री सापडले होते. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी आसाममधील सिलचर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले होते. ज्या मंत्र्यांच्या घरांना आंदोलकांनी लक्ष्य केले, त्यामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री सापम रंजन, सार्वजनिक वितरणमंत्री एल. सुसींद्रो सिंह आणि शहरी विकासमंत्री वाय. खेमचंद यांच्या घरांचा समावेश आहे. उफाळलेला हिंसाचार विचारात घेऊन राज्य सरकारने इंफाळ पूर्व आणि पश्चिम, बिष्णुपूर, थौबल आणि कचिंग जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.