यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कुठे पैसे वाटले जात आहेत, कुठे मतदान केंद्रच ताब्यात घेतले जात आहे तर कुठे बोगस मतदान केले जात आहे. अशातच बिहारच्या सारण लोकसभा मतदारसंघात मतदानानंतर दुसऱ्या दिवशी हिंसाचार झाल्याचे वृत्त येत आहे.
या जागेवर राजदकडून रोहिणी आचार्य उमेदवार आहेत. सोमवारी सायंकाळी पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर त्या एका मतदान केंद्रावर गेल्या होत्या तिथे जोरदार गोळीबार झाला आहे. मतदान संपल्यानंतर त्या मतदान केंद्रावर आल्याने वाद झाला होता. यातून मंगळवारी दोन्ही गटांमध्ये जोरदार गोळीबार झाला आहे. यामध्ये तीन लोक जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर छपराच्या भिकारी ठाकुर चौकाजवळ मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस अधिकाऱ्यांसह डीएम देखील तिथे हजर आहेत.
रोहिणी यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना चुकीची वागणूक दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच रोहिणी यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेही होते. लोकांनी विरोध करताच त्यांनी काढता पाय घेतला होता. परंतु मंगळवारी सकाळी पुन्हा वाद सुरु झाला आणि गोळीबार झाला आहे.