नवी दिल्ली – हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. मिरवणुकीवेळी २ गटाचे लोक समोरासमोर आल्याने त्यांनी एकमेकांवर दगड विटा फेकून मारल्या. हल्लेखोरांनी पोलिसांनाही निशाणा बनवलं. या घटनेत ६ पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण ७ जण जखमी झाले आहेत. दिल्ली पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. मिरवणुकीत झालेल्या गोंधळात गोळीबार झाल्याचाही संशय आहे. एक पोलीस गोळीबारात जखमी झाला आहे.
स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, मिरवणुकीवेळी गोळीबारी झाली. जहांगीरपुरीच्या ज्या परिसरात शोभायात्रा संध्याकाळच्या वेळेत काढली तेव्हा हिंसाचार घडला. मात्र सकाळी काढलेल्या शोभायात्रा शांततेत निघाली. संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी मिरवणुकीत हिंसाचार सुरू झाला. ही वेळ इफ्तारच्या आधी नमाज पठण करण्यासाठी येतात तेव्हाची आहे. हिंसाचाराची सुरुवात मशिदीच्या काही अंतरावर झाली. जेव्हा शोभायात्रा मशिदीजवळ पोहचली तेव्हा लोकं घोषणाबाजी आणि म्युझिकचा आवाज वाढवू लागले. काहींनी मशिदीवर भगवा झेंडा लावण्याचा प्रयत्न केला असाही आरोप आहे. मात्र दुसऱ्या गटाने हा आरोप फेटाळून लावला.
स्थानिक लोकांनुसार, मिरवणुकीत असलेल्या साऊंड सिस्टमचा आवाज जास्त असल्याने शोभायात्रा रोखण्यात आली. त्यामुळे २ गटात वाद सुरू झाला. सकाळी याच परिसरात शोभायात्रा काढली तेव्हा काहीही हिंसाचार झाला नाही मग संध्याकाळी शोभायात्रा का रोखली असं एका गटाचं म्हणणं आहे. तर पोलिसांना वेगळाच संशय आहे. कारण या मिरवणुकीवेळी गोळीबार झाला आणि त्यात एका पोलीस अधिकाऱ्यालाही गोळी लागली. एकूण ६ राऊंड फायर झाल्याचं बोलले जात आहे. मात्र त्याला पुष्टी मिळाली नाही.
त्याचसोबत दगडं घरांच्या छतावर पहिल्यापासून जमा करण्यात आले होते. घरांवरील छतावर दगडं जमा केल्याबद्दल पोलीस आता ड्रोनद्वारे तपास करत आहे. जर दगडं आत्ताही छतावर असतील तर ड्रोनच्या मदतीने ते शोधता येतील. मिरवणुकीवेळी दोन्ही बाजूने प्रचंड दगडफेक करण्यात आली. जहांगीरपुरीच्या परिसरात संध्याकाळी ४ वाजता हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. संध्याकाळी पावणे सहा वाजता शोभायात्रा सी ब्लॉकजवळ पोहचली तेव्हा त्याठिकाणी वाद सुरू झाला आणि त्याचे रुपांतर हिंसाचारात झाले. संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याच्या हाताला गोळी लागली तर हिंसाचारात ६ पोलीस जखमी झाले. ७ च्या सुमारात वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १ तास लागला. रात्री ८ वाजता पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली.