बलवंत तक्षक -
गुरुग्राम/चंडीगड : हरयाणातील हिंसाचाराचे लोण गुरुग्रामपर्यंत पोहोचले आहे. येथील एका धार्मिकस्थळावर जमावाने मंगळवारी हल्ला केला, त्यात एका जणाचा मृत्यू झाला. नूह जिल्ह्यात एक मिरवणूक रोखण्याच्या प्रयत्नात उसळलेल्या हिंसाचारात मृतांची संख्या पाच झाली, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.मंगळवारी नूहमध्ये दोन दिवसांचा कर्फ्यू लागू केला. तेथे झालेल्या हिंसाचारात गृहरक्षक दलाच्या दोन जवानांसह ४ जण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. दरम्यान, हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी दावा केला की, हिंसा पूर्वनियोजित होती. तर अफवांमुळे हा हिंसाचार वाढल्याचे पोलिसांनी सांगितले.
कठोर कारवाई करणार : खट्टरहरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले की, या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. आजची घटना दुर्दैवी आहे. मी सर्व जनतेला राज्यात शांतता राखण्याचे आवाहन करतो.
आयपीएस ममतांमुळे २५०० जणांची सुटकाहिंसाचारादरम्यान अतिरिक्त पोलिस महासंचालक ममता सिंह यांनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एका धार्मिकस्थळात अडकलेल्या २५०० हून अधिक लोकांना समाजकंटकांपासून सुखरूप वाचविले. काही अंतरावर हल्लेखोरांनी जाळपोळ केली. अशा परिस्थितीत लोक तिथून गेले असते तर हिंसाचारात अडकले असते.
जमावाचा गोळीबारगुरुग्राममध्ये धार्मिकस्थळाजवळ जमावाने गोळीबार केला आणि आग लावली. यात दोन जण जखमी झाले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नूहमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या आणखी दोघांचा मृत्यू झाला. नूह येथील हिंसाचारात २३ जखमींमध्ये दहा पोलिसांचा समावेश आहे.
२१व्या शतकातील भारतात धर्माच्या नावावर होणारा हिंसाचार खपवून घेतला जाऊ शकत नाही आणि अशा फूट पाडणाऱ्या घटकांविरुद्ध लोक एकत्र न आल्यास, त्याचे परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागतील.- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
समाजकंटकांचा धुडगूसगुरुग्राममध्ये समाजकंटकांनी रस्त्यावर जे वाहन दिसेल, ते जाळून टाकले. त्यांनी पोलिस ठाणे पेटवून दिले. काही ठिकाणी लूटमार करून दुकाने जाळण्यात आली. एका वाहनाच्या शोरूममधून २०० बाइक लुटून शोरूमची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण केली.