मणिपूरच्या इम्फाळ शहरात सुरक्षा दल आणि जमावामध्ये रात्रभर झालेल्या चकमकीत दोन नागरिक जखमी झाले. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. पोलीस आणि लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, काल रात्री मणिपूरमधील क्वाथा आणि कांगवई भागात स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला आणि आज सकाळपर्यंत मधूनमधून गोळीबार होत असल्याची माहिती आहे. जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. इम्फाळमध्ये जमावाने भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न केला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाकटा आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील कंगवाई येथून रात्रभर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याचेही वृत्त आहे. इम्फाळ पश्चिम येथील इरिंगबाम पोलीस स्टेशन लुटण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या काळात एकही शस्त्र चोरीला गेलं नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दंगलखोरांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर रॅपिड एक्शन फोर्स (RAF) यांनी मध्यरात्रीपर्यंत इम्फाळमध्ये संयुक्त मोर्चा काढला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 1,000 लोकांच्या जमावाने पॅलेस कॉम्प्लेक्सजवळ असलेल्या इमारतींना आग लावण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएएफने जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी सांगितले की, इम्फाळमध्ये जमावाने आमदार बिश्वजित यांच्या घरालाही आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरएएफच्या ताफ्याने जमावाला पांगवले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्रीनंतर जमावाने सिंजमाई येथील भाजपा कार्यालयाचा घेराव केला, परंतु सैन्याने जमावाला पांगवल्यामुळे ते नुकसान करू शकले नाहीत.
ते म्हणाले की, अशाच प्रकारे मध्यरात्रीच्या सुमारास एका जमावाने भाजपाच्या शारदा देवी यांच्या इम्फाळमधील पोरामपेटजवळील घराची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केला. मणिपूरमध्ये 3 मे रोजी हिंसक चकमकी सुरू झाल्या आणि अनुसूचित जमातीच्या (एसटी) दर्जाच्या मेईती समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मोर्चा' काढण्यात आला. हिंसाचाराचा उद्रेक झाल्यापासून राज्यात आतापर्यंत सुमारे 120 लोकांचा मृत्यू झाला असून तीन हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.