इम्फाळ : मणिपुरात शुक्रवारी पुन्हा हिंसाचार उफाळून आला. भूमिपुत्र आंदोलनकर्त्यांनी एका शासकीय इमारतीला आग लावली, तर चुराचंदपूर जिल्ह्यात मंत्र्याच्या घरावर हल्ला करण्यात आला.हिंसाचाराच्या ताज्या घटनांमुळे जिल्हा मुख्यालयात संचारबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मंगखोगिन हाओकिप यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्यांनी येथून ९८ कि. मी. अंतरावरील सिंगंगटमध्ये गुरुवारी रात्री उपविभागीय अधिकाऱ्याच्या जुन्या इमारतीची जाळपोळ केली. जुन्या इमारतीतील बहुतांश फाईल्स नव्या इमारतीत स्थानांतरित करण्यात आल्याने नुकसान टळले. आंदोलनकर्त्यांनी आरोग्यमंत्री फुंगजाथंग तोनसिंग यांच्या घरावरही हल्ला केला. यापूर्वी ३१ आॅगस्टच्या रात्री त्यांच्या घरात मोठा विद्ध्वंस करण्यात आला होता. गेल्या सोमवारी मणिपूर विधानसभेने तीन वादग्रस्त विधेयके पारित केल्यानंतर झालेल्या हिंसाचारात ८ जण ठार, तर ३१ जखमी झाले होते. या विधेयकांमध्ये मणिपुरातील लोकांचे संरक्षण विधेयक २०१५, मणिपूर भूमी महसूल आणि भूसुधार (सातवी दुरुस्ती) विधेयक २०१५ आणि मणिपूर दुकान आणि प्रतिष्ठाने दुरुस्ती विधेयक २०१५ यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
मणिपुरात हिंसाचार चालूच
By admin | Published: September 04, 2015 10:31 PM