ऑनलाइन लोकमत
भटिंडा, दि. १४ - 'गुरू ग्रंथ साहेब' या धार्मिक ग्रंथाची विटंबना झाल्याच्या अफवेनंतर पंजाबमधील कोटकपूरा येथे शीख आंदोलक रस्त्यावर उतरून झालेल्या हिंसाचारात ८ पोलिसांसह १५ जण जखमी झाले आहेत. निदर्शकांना थोपवण्यासाठी पोलिसांना अश्रू-धुराचा मारा करावा लागला. या घटनेनंतर आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोणतीही अनुचित घटना घडू नये व शांतता रहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, भटिंडा-कोटकपूरा मार्गावरील एका धार्मिक स्थळावरून गुरू ग्रंथ साहिब हा धार्मिक ग्रंथाची चोरी झाली होती. त्याची विटंबना झाल्याची अफवा उठली आणि त्या निषेधार्थ सहा हजार शीख नागरिक रस्त्यावर उतरले. त्यात अनेक जण जखमी झाले असून पोलिसांनी ५०० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी निषेध व्यक्त केला असून कोणालाही राज्यातील जातीय सलोखा व शांतत बिघडवू देणार नाही, असे म्हटले आहे.