राजस्थान: पानिपत चित्रपटाच्या विरोधात राजस्थांमध्ये आंदोलने सुरू झाली आहेत. जयपूर, भरतपूर आणि बिकानेरमध्ये निदर्शने झाली आहेत. जयपूरच्या एका चित्रपटागृहात निदर्शकानी दगडफेकही केली आहे. मोठय़ा संख्येत लोक रस्त्यांवर उतरले असून त्यांनी दिग्दर्शकाच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे. त्यांनतर वैशाली नगर पोलिसांनी 7 तरुणांना ताब्यात घेतले.
‘पानिपतः द ग्रेट ब्रिटिश’ चित्रपटात 'इतिहासाची खोटी' माहिती दाखवल्याच्या आरोपावरून राजस्थानात निदर्शने करण्यात येत आहेत. आंदोलकांनी दावा केला आहे की, या चित्रपटात इतिहासात मोडतोड करण्यात आली आहे. ज्यामुळे राजा सूरजमल यांच्या प्रतिमा खराब होत आहे. तसेच त्यांना या चित्रपटात स्वार्थी असल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप सुद्धा आंदोलकांनी केला आहे.
शहरात लावण्यात आलेले चित्रपटाचे पोस्टर्स आंदोलकांनी फाडले असून ज्या सिनेमागृहात हा चित्रपटप्रदर्शित झाला तिथे तोडफोड करण्यात येत आहे. तर भरतपूर येथे आंदोलकांनी सिनेमागृहाच्या दरवाजावरच ठिय्या आंदोलन सुरु केल्याने राजस्थानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर राज्याचे मंत्री विश्वेंद्र सिंग हे राजा सूरजमल यांचे वशंज असून त्यांनी या चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
राजस्थानमध्ये पानिपतला होत असलेल्या विरोधात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सुद्धा उडी घेतली आहे. चित्रपट निर्मात्यांनी समाजाच्या भावनांची काळजी घ्यायला हवी असे गहलोत म्हणाले. तर पानीपतला लोकांचा प्रचंड विरोध आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही वितरकांशी बोललो आहे. गृहसचिव आणि अन्य अधिकारी चित्रपट निर्माते आणि वितरकाशी बोलत असून यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न करत असल्याचे सुद्धा गहलोत म्हणाले.