Mallikarjun Kharge On BJP: रामनवमीच्या दिवशी देशातील विविध भागात झालेल्या हिंसाचार आणि दंगलीवरुन भाजपवर टीका होत आहे. यातच आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपवर गंभीर आरोप करत ते म्हणाले की, भाजप कमकुवत होत असल्याचे लक्षात येताच दंगली भडकवतो आणि ध्रुवीकरण करतो. हे भाजपचेच कृत्य आहे, अशी टीका त्यांनी केली.
पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये रामनवमीच्या दिवशी (30 मार्च) झालेल्या हिंसाचारावरुन सर्वच विरोधी पक्षांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे गटातील संजय राऊत यांनीही या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला होता. बंगालमधील हिंसाचार भाजपने घडवून आणल्याचे त्यांनी म्हटले. जिथे निवडणुका जवळ येत आहेत आणि भाजपला आपले नुकसान होण्याची भीती आहे, तिथे दंगली होत आहेत, असेही ते म्हणाले होते.
बिहार हिंसाचाराबद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित शर्मा यांनी यापूर्वी म्हटले होते की, आजकाल बिहारमध्ये जे काही घडत आहे ते आपल्याला 1989 च्या दंगलीची आठवण करून देत आहे. त्या दंगलीत किती लोकांचा जीव गेला माहीत नाही. निष्पाप लोक मारले गेले, ज्यांना आजवर न्याय मिळाला नाही. बिहारमध्ये पुन्हा एकदा अशीच दंगल घडवण्याचा भाजपचा डाव आहे.