नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या मनेका गांधी, काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंदिया, शीला दीक्षित, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव अशा अनेक बड्या उमेदवारांचे भवितव्य लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात झालेल्या मतदानात रविवारी इव्हीएमबंद झाले. सात राज्यांत ५९ लोकसभा जागांसाठी रविवारी सरासरी ६३.३ टक्के इतके मतदान झाले. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी व भाजपमधील कडव्या संघर्षामुळे गाजत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८०.१३ टक्के मतदान झाले. परंतु या राज्यात तुरळक हिंसाचाराचे गालबोट लागले.पश्चिम बंगालमधील घटाल मतदारसंघात भाजपच्या उमेदवार व माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्यावर ताफ्यावर हल्ला झाला. केशपूर येथे मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कळताच त्या तिथे गेल्या. तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. गावठी बॉम्बचाही स्फोट घडविण्यात आला. या घटनेत घोष यांचा एक अंगरक्षक जखमी झाला व ताफ्यातील एका वाहनाची नासधूस झाली आहे. यावेळी घोष यांच्याबरोबर असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानाने केलेल्या गोळीबारात तृणमूल काँग्रेसचा एक जण जखमी झाला आहे. हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसने घडविला असून त्याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील मतदारांना प्रभावित करण्यासाठी भाजप आणि आरएसएसचे कार्यकर्ते सुरक्षा दलांच्या वेशात येत आहेत, असा आरोप केला.बिहारमधील शेओहर लोकसभा मतदारसंघात होमगार्डच्या बंदूकीतून चुकून उडालेली गोळी लागून एक निवडणूक कर्मचारी ठार झाला. बिहारच्या पश्चिम चंपारण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय जयस्वाल यांनाही काही जणांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याचेसमजते.हरयाणामध्ये जिंद जिल्ह्यात तीन बूथवरील ईव्हीएम यंत्रांवर आपले निवडणूक चिन्ह नीट दिसत नसल्याची तक्रार जननायक जनता पार्टीचे उमेदवार दिग्विजय चौटाला यांनी केली. अन्य राज्यांतही काही ठिकाणी मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे प्रयत्न झाल्याच्या तक्रारी आहेत.या ५९ मतदारसंघातील सर्वाधिक ४३ जागा भाजपकडे होत्या. या जागा राखणे हे भाजपपुढे मोठे आव्हान असणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यकय्या नायडू, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींनीही मतदानाचा हक्क बजावला. प्रियांका गांधी मतदान करण्यास आल्या त्यावेळी सोबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील होते.
सहाव्या टप्प्याला हिंसाचाराचे गालबोट; देशात ६३% मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८० टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 06:10 IST