पंचकुला, दि. 25 - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना बलात्कार प्रकरणात सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर पंजाब, हरियाणा या दोन राज्यांमध्ये हिंसाचार सुरु झाला आहे. राम रहीम यांच्या समर्थकांनी प्रसारमाध्यमांच्या ओबी व्हॅन्स फोडल्या. सुरक्षापथकांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या.
काही ठिकाणी हवेत गोळीबारही करावा लागला. पंजाबमध्ये दोन रेल्वे स्थानके जाळून टाकल्याचे वृत्त आहे. पंचकुलामध्ये जमावाने सुरक्षापथकांवरच हल्ला केला. यावेळी जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे पोलिसांना मागे हटावे लागले. गोळीबारात दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अनेक गाडयांची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त आहे.
घटनाक्रम -
- आतापर्यंत झालेल्या हिंसाचारामध्ये 12 जण जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे.
- हिंसाचारमध्ये 10 जण जखमी झाले असून, त्यांना पंचकुलाच्या सेक्टर 6 मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- पंजाबमधील मालौत रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप जाळले, भतिंडामध्येही अशीच परिस्थिती आहे.
- पंचकुलामध्ये आजतक, टाइम्सनाऊची ओबी व्हॅन्स जाळल्या.
- पंचकुलामध्ये एका पत्रकारांची दुचाकी जाळली.
- पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी डेरा समर्थकांना शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
- पंचकुलाच्या सेक्टर 5 मध्ये हिंसक झालेल्या जमावाला आवर घालण्यासाठी लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या.
- पंजाब, हरयाणामधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सर्तकेचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली - आनंद विहार रेल्वे टर्मिनसमध्ये उभी असलेल्या रेवा एक्स्प्रेसच्या दोन रिकाम्या डब्यांना आग
- बाबा राम रहीम प्रकरण - पंचकुला हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू , सरकारी रुग्णालयातील डॉकराची माहिती.
-पंजाब : मुक्तसर, भटिंडा आणि मानसा येथे संचार बंदी लागू
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर निमलष्करी दलाच्या 53 तुकडया आणि हरयाणा पोलिस दलाचे 50 हजार जवान तैनात करण्यात आले होते तसेच पंजाब, हरयाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये 72 तासांठी इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती.