नवी दिल्ली - केंद्र सरकराने पारीत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी काल आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. या हिंसाचाराचे पडसाद शेतकरी आंदोलनामध्ये उमटले आहे. ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने १ फेब्रुवारी रोजी होणारा संसद मार्च रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.संयुक्त किसान मोर्चाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा मोर्चा सरकारी कारस्थानाची शिकार झाला. दीप सिद्धू हा आरएसएसचा एजंट आहे. दीप सिद्धू याने लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवून तिरंग्याचा अपमान केला आहे. त्यामुळे देश आणि आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.