अहमदाबाद : गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा गोरक्षकांना देतानाच महात्मा गांधी व विनोबा भावे यांनी गोरक्षणाचा जो मार्ग दाखवला, त्याच मार्गाने आपण पुढे जायला हवे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना मोदी म्हणाले की, आपण अहिंसेची शिकवण मिळालेल्या देशात आहोत. गांधीजींच्या देशात आपण राहतो. त्यांनी आपला अहिंसेचा मार्ग कसा यशस्वी ठरतो, हे दाखवून दिले आहे. त्यांनी आणि विनोबा भावे यांनी आपल्याला गोरक्षणाचा जो मार्ग दाखवला, तोच आपण आत्मसात करायला हवा.पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांकडून होणाऱ्या हिंसाचाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, असे सांगत हिंसाचाराच्या घटनांबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. दोनच दिवसांपूर्वी झारखंडमध्ये एका व्यक्तीच्या घराबाहेर गाय मरून पडल्याचे दिसताच, तेथील लोकांनी त्याला मारहाण केली आणि त्याचे घर पेटवून दिले. मोदी यांच्या आजच्या भाषणाचा हा संदर्भ आहे. यापूर्वी हरयाणामध्ये अखलाक नावाच्या व्यक्तीला गोरक्षकांनी ठारच मारले होते. गोरक्षकांनी आतापर्यंत अनेकांवर असे हल्ले केले आहे. मध्यंतरी राजस्थानात तामिळनाडू सरकारने गायी खरेदी केल्या. त्या ट्रकने नेणाऱ्यांवरही गोरक्षकांनी हल्ला केला होता. ज्या देशात कुत्र्यांना खायला दिले जाते, मुंग्यांना अन्न दिले जाते, त्या देशातील लोकांना काय झाले आहे, ते हिंसाचार का करीत आहेत, असा सवाल करून मोदी म्हणाले की, रुग्ण मरण पावला की त्याचे नातेवाईक रुग्णालयच जाळू लागले आहेत. ही चिंतेची बाब आहे.महात्मा गांधी यांचे आध्यात्मिक गुरू श्री राजचंद्र यांची शिकवण आपण समजून घेतली पाहिजे, असेही मोदी यावेळी म्हणाले. तसेच चंपारण सत्याग्रहाला १00 वर्षे पूर्ण झाल्याचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते श्री राजचंद यांच्यावरील टपाल तिकीट व नाणे यांचे प्रकाशन त्यांनी केले. साबरमती आश्रमात त्यांनी काही मिनिटे सूतकताईही केली. (वृत्तसंस्था)
गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही
By admin | Published: June 30, 2017 2:13 AM