नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन ईशान्येकडील राज्यात सुरु असणाऱ्या हिंसक आंदोलनाचे पडसाद हळूहळू राजधानी दिल्लीत उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन सगळ्यांना शांततेचं आवाहन करत कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं सांगितले आहे.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन सांगितलं आहे की, नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन हिंसक आंदोलन करणे हे दुर्दैवी आणि अत्यंत त्रासदायक आहे. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे आपल्या लोकशाहीचा भाग आहे. पण कधीही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन सर्वसामान्यांच्या जीवनात अडथळा निर्माण करणे हे आपल्या तत्वात बसत नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
त्याचसोबत नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ हा कायदा आपल्या संसदेत बहुमताने पारित झालेलं आहे. मोठ्या संख्येने राजकीय पक्ष आणि खासदारांनी त्यास पाठिंबा दर्शविला आहे. हा कायदा भारताच्या वर्षानुवर्षे स्वीकारलेली सुसंवाद, करुणा आणि बंधुता या संस्कृतीचे वर्णन करतो. या कायद्यामुळे कोणत्याही धर्माच्या भारतीय नागरिकावर परिणाम होणार नाही हे मी स्पष्ट करतो. या कायद्यासंदर्भात कोणत्याही भारतीयांना काळजी करण्याची काही गरज नाही. हा कायदा फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांच्यावर अनेक वर्ष अत्याचाराचा सामना करावा लागत आहे. भारतसोडून त्यांना दुसरीकडे कुठेही आसरा नाही असं मोदींनी सांगितले.
दरम्यान, आपण सर्वांनी एकत्रितपणे भारताच्या विकासासाठी आणि प्रत्येक भारतीय, विशेषतः गरीब, वंचित आणि शोषितांच्या सक्षमीकरणासाठी काम करणं ही काळाची गरज आहे. आम्ही स्वार्थासाठी स्वारस्य असलेल्या गटांना आमचे विभाजन करण्यास आणि त्रास निर्माण करण्यास थारा देऊ शकत नाही. शांतता, ऐक्य आणि बंधुता टिकवण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवा व इतर खोटेपणापासून दूर रहावे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं.
संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाने प. बंगाल व ईशान्येकडील राज्ये धुमसत असताना, रविवारी देशाच्या राजधानीतही या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर आता लखनऊ, मुंबईसह देशभरातील विविध भागात आंदोलन सुरु आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या लायब्ररीत बसून पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध विद्यार्थी करत आहेत. तसेच, जामिया विद्यापीठातील विद्यार्थी आजही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येही उमटले. येथील नदवा कॉलेजमध्ये सोमवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन करत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.