वाराणसी, दि. 24 - बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींशी होणाऱ्या छेडछाडीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आटोपल्यानंतर शनिवारी विद्यापीठाच्या आवारात हिंसाचार भडकला असून, मुलींच्या वसतिगृहांमधून पोलीस आणि अर्धसैनिक दलांच्या जवानांवर दगड आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. व्हीसी लॉजजवळ पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याचे वृत्त आल्यानंतर हा हिंसाचार भडकला. हे विद्यार्थी छेडछाडीच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या विद्यार्थिनींचे समर्थन करत आहेत. रात्री 12 वाजल्यानंतर बीएचयूच्या वसतिगृहांमधून पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. या हिंसक घटनांमुळे विद्यापीठ 2 ऑक्टोबरपर्यंत बंद करण्यात आले आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कुलगुरू जी.सी. त्रिपाठी यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शन करण्यासाठी निघालेल्या विद्यार्थांवर सुरक्षा रक्षकांनी लाठीमार केला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संतापाचा भडका उडाला. त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये अनेक सुरक्षारक्षही जखमी झाले. तसेच बीएचयूच्या वसतीगृहांमधून पोलीस आणि सुरक्षारक्षकांवर पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले.
दरम्यान कुलगुरूंनी या घटनेच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना केली आङे. याआधी विद्यार्थ्यांनी कुलगुरूंविरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरला आग लावली होती. गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थिनी सुरक्षेच्या प्रश्नावरून रस्त्यावर उतरल्या आहेत. वाराणसीचे एसएसपी आर.के. भारद्वाज यांनी सांगितले की, "बीएचयूमझ्ये मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच एसपी (शहर) दिनेश सिंह घटनास्थळी तळ ठोकून आहेत.