ऑनलाइन लोकमत
मेहसाणा, दि. १७ - पाटीदार पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेलच्या सुटकेसाठी रविवारी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत पोलिसांसह दोन डझन लोक जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी मेहसाणामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
हार्दिक पटेलची तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी आंदोलकांना रॅली काढायची होती. मात्र या रॅलीला परवानगी नाकारल्यानंतर हिंसाचार सुरु झाला. पटले समाजाचे महत्वाचे नेते लालजी पटेलही या आंदोलनात जखमी झाले. पोलिसांनी रॅली रोखल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली.
हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या. पोलिसांनी लाठीचार्जही केला. काही पोलिसही दगडफेकीत जखमी झाले. परवानगी नसतानाही आंदोलकांनी रॅली काढली. पोलिसांवर दगडफेक झाली त्यामुळे मग पोलिसांनीही कायद्यानुसार कारवाई केली असे मेहसानाच्या जिल्हाधिका-यांनी सांगितले.
पटेल अनामत आंदोलन समितीने उत्तर गुजरातमध्ये उद्या बंदची हाक दिली आहे. शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोक-यांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी मागच्यावर्षीपासून पटेल समाजाचे आंदोलन सुरु आहे. २३ वर्षांचा हार्दिक पटेल या आंदोलनाचे नेतृत्व करत असून, त्याला मागच्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली. तेव्हापासून तो तुरुंगात बंद आहे.