ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 17 - श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी सोमवारी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करत या मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली. ज्यात एक सुरक्षारक्षक जखमी झाला आहे.
विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाला अश्रूधूर सोडावा लागला. श्रीनगरमधील पुलवामा येथील ही घटना आहे. या घटनेनंतर जवानांच्या लाठीचार्जविरोधात काश्मीर खोऱ्यातील सर्व महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून श्रीनगरमध्ये कोणत्या-न्-कोणत्या गोष्टीवरुन हिंसाचार सुरूच आहे.
श्रीनगरमध्ये सुरक्षारक्षकांच्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू
दरम्यान, श्रीनगरमध्ये (15 एप्रिल) शनिवारी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात एका तरूणाचा मृत्यू झाला. तर, दुस-या घटनेत सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत पुलवामा येथे 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात सज्जाद अहमद या तरूणाचा मृत्यू झाला आहे.
उत्तर काश्मीरच्या बटमालू परिसरात सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारामध्ये सज्जादचा मृत्यू झाला असं स्थानिकांचं म्हणणं आहे. मात्र, पोलिसांनी हे वृत्त खोडून काढत परिसरात सुरक्षा रक्षकांची तैनाती करण्यात आळी नव्हती आम्ही प्रकरणाची चौकशी करत आहोत असं म्हटलं आहे.
तर, पुलवामा येथे एका स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबाहेर पोलीस चौकी बांधण्याचा विरोध करताना सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करण्यात आली. प्रत्युत्तरात जवानांनी अश्रु धूराच्या नळ्या सोडल्या त्यामुळे 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे.