नवी दिल्ली - सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार बालाभास्कर यांचे मंगळवारी (2 ऑक्टोबर) सकाळी निधन झाले. गेल्या आठवड्यात कार अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले होते. तिरुवअनंतपुरममधील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. ते 40 वर्षांचे होते. या भीषण अपघातात बालाभास्कर यांची दोन वर्षांची मुलगी तेजस्विनीचा जागीच मृत्यू झाला होता.
25 सप्टेंबर रोजी थ्रिसूरमधील मंदिराचे दर्शन घेऊन बालाभास्कर कुटुंबीयांसोबत परतीचा प्रवास करत होते. यावेळेस पल्लिपुरम येथे त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. कारमध्ये चालक, बालाभास्कर, त्यांची पत्नी, मुलगीदेखील होते. अपघातात बालाभास्कर यांच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याला गंभीर इजा झाली होती. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी बालाभास्कर यांचे निधन झाले. बालाभास्कर यांच्या पत्नी लक्ष्मी आणि कारचालक अर्जुन यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, बालाभास्कर यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. तिरुवअनंतपुरममधील ज्या कॉलेजमध्ये बालाभास्कर यांनी शिक्षण घेतले, तेथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.