नवी दिल्ली : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी जसे एअरफोर्स वन हे अभेद्य विमान आहे तसेच विमान भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधानांसाठी देखील बनविण्यात आले आहे. यापैकी पहिले विमान आज दिल्ली विमानतळावर दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे विमान अमेरिकेत बनविण्यात आले आहे. एअर इंडिया वन हे विमान एअर इंडियाच्या व्हीव्हीआयपी ताफ्यात दाखल झाल्यावर आधीची 25 वर्षे जुनी विमाने हटविण्यात येणार आहे. तसेच या नव्या विमानाचे सारथ्य भारतीय हवाई दलातील वैमानिकच करणार आहेत.
भारत सरकारने विशेष पद्धतीने बनवलेली बोईंग ७७७-३०० ईआर अशाप्रकारची दोन विमाने मागवली आहेत. यातील एक विमान पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तर दुसरे विमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी असेल. एअर इंडिया वन विमानाला भारतात आणण्यासाठी एअर इंडिया, भारताचे हवाई दल आणि सरकारमधील काही अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांचे एक पथक ऑगस्टमध्ये अमेरिकेत गेले होते.
खास वैशिष्ट्येएअर इंडिया वन विमानामध्ये अॅडव्हान्स आणि सिक्योर कम्युनिकेशन सिस्टिम लावण्यात आले आहेत. ही विमाने पूर्णपणे एअर कमांडच्या रूपात काम करतात. या विमानांच्या अत्याधुनिक ऑडिओ-व्हिडीओ प्रणालीला टेप किंवा हॅक करता येत नाही. ही दोन्ही विमाने एका मजबूत किल्ल्याप्रमाणे असतील. त्यांच्या खरेदीवर तब्बल ८ हजार ४५८ कोटी रुपये खर्च येणार आहे. एअर इंडिया वन विमानांमध्ये मिसाइल डिफेन्स सिस्टिम, सेल्फ प्रोटेक्शन सूट आहे. ही प्रणाली शत्रूराष्ट्राच्या रडार फ्रिक्वेन्सीला जॅम करू शकते. एअर इंडिया वन विमानाच्या आत एक कॉन्फ्रन्स रूम, व्हीव्हीआयपी प्रवाशांसाठी एक केबिन, एक मेडिकल सेंटर आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्ती आणि कर्मचाऱ्यांसाठी आसनव्यवस्था असेल. या विमानावर एअर इंडिया वनची खास साइन असेल. या साइनचा अर्थ विमानामधून राष्ट्रपती किंवा पंतप्रधान प्रवास करत आहेत, असा असेल. एअर इंडिया वन विमानावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोकचक्रासह भारत आणि इंडिया असे लिहिलेले असेल.
सलग 17 तासांचे उड्डाणएअर इंडिया वन विमानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे इंधन भरल्यानंतर हे विमान सलग १७ तास उड्डाण करणार आहे. सध्या भारताच्या व्हीव्हीआयपी ताफ्यामध्ये जी विमाने आहेत ती सलग १० तास उड्डाण करण्यात सक्षम आहेत.