नवी दिल्ली - जगात अनेक विचित्र गोष्टी असतात, ज्यांचा कधी कधी माणसांवर देखील खूप वाईट परिणाम होतो. या परिस्थितीमुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. असंच काहीस एका भारतीय तरुणीसोबत घडलं आहे, जी तिच्या खऱ्या वयापेक्षा खूपच लहान दिसते. तुम्ही म्हणाल की उंची लहान असणे किंवा वयापेक्षा लहान दिसणं हे सामान्य आहे, परंतु जर आम्ही तुम्हाला सांगितलं की ही 19 वर्षांची मुलगी फक्त 6 वर्षांची दिसते तर सुरुवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे.
ऑडिटी सेंट्रल वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, गुजरातमधील नाजापूर येथे राहणारी अबोली जारित 19 वर्षांची असली तरी ती 6 वर्षांच्या मुलीसारखी दिसते. तिची उंचीही केवळ 3 फूट 4 इंच आहे. यामागे एक विचित्र कंडिशन आहे ज्यामुळे तिचं शरीर असं झालं आहे. ती लहान असताना तिला रीनल रिकेट्स (Renal rickets) त्रास झाल्याचं तपासात उघड झालं. ही एक अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे, ज्यामध्ये मुलाच्या हाडांची योग्य वाढ होत नाही, तसेच तिला किडनीचा आजार देखील होता.
मुलीचा जन्म ब्लॅडरशिवाय झाला होता, ज्यामुळे तिला सतत डायपर घालावं लागतं. ब्लॅडरचं काम लघवी थांबवणं आणि साठवणं हे आहे. अशात तिला ब्लॅडर नसल्याने तिच्या शरीरातून लघवी सतत बाहेर पडत असते, त्यामुळे तिला सतत डायपर घालावं लागतं. कालांतराने तिची हाडं अधिकाधिक कमकुवत होत गेली आणि आता तिला चालताही येत नाही. अनेक अडचणी असूनही ही तरुणी आपला सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवते.
जॅम प्रेस मीडियाशी बोलताना ती म्हणाली "या आजाराने अनेक लोकांचा मृत्यू होतो. चांगली बातमी ही आहे, की मी जिवंत आहे." मुलीने सांगितलं की तिला बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्ये गायिका आणि अभिनेत्री बनायचं आहे आणि तिला आशा आहे की ती कधीतरी हे स्वप्न पूर्ण करेल. तिनं सांगितलं की तिला तिच्या विचित्र स्थितीमुळे प्रसिद्ध व्हायचं नाही, तर तिच्या टॅलेंटमुळे प्रसिद्धी मिळवायची आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.