नवी दिल्ली - विविध प्रकारचे रंगीबेरंगी कपडे परिधान करणं सर्वांनाच आवडतं. श्रीमंत मंडळी हवे असलेले कपडे कोणत्याही वेळी आणि कितीही किंमत मोजून विकत घेऊ शकतात. त्यांना हवी तशी फॅशन करू शकतात. मात्र गरीबांसाठी नवीन कपडे घेणं ही गोष्टच थोडी अवघड आहे. त्यांच्यासाठी हे सोपं नसतं. पैसे नसल्याने त्यांना हे शक्य होत नाही. पण हीच गोष्ट लक्षात घेऊन चार मित्रांनी पुढाकार घेतला आहे. गरीबांना त्यांच्या आवडीचे कपडे खरेदी करता यावेत, यासाठी एक अनोखं दुकान सुरू करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या दुकानात कोणतीही वस्तू ही फक्त एका रुपयात विकत मिळते.
गरीब मुलांना देखील त्यांच्या आवडीचे नवीन कपडे वापरता यावेत, यासाठी चार मित्रांनी एकत्र येत ही अनोखी कल्पना साकारली आहे. बंगळुरूतील इलेक्ट्रॉनिक सिटी (Electronic City, Bengaluru) परिसरात हे दुकान सुरू करण्यात आलं आहे. इमॅजिन क्लोथ बँक (Imagine Clothes Bank) असं या दुकानाचं नाव आहे. काही वर्षांपूर्वी चार विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांच्या कपड्याविषयी काहीतरी करण्याची कल्पना सुचली. गरीबांना चांगले कपडे घालता यावेत आणि आत्मसन्मानानं राहता यावं, यासाठी हे गरजेचं असल्याचं त्यांना वाटत होतं.
अवघ्या एका रुपयात वस्तू घेता येतात विकत
चिमुकल्यांसाठी त्यांनी एक एनजीओ सुरू केली. एनजीओमार्फत हे दुकान सुरू करण्यात आलं असून कुठलीही गरीब व्यक्ती या ठिकाणी येऊन अवघ्या एका रुपयात वस्तू विकत घेऊ शकते. गरीबांचा आत्मसन्मान कायम राहावा आणि आपण काही फुकट घेतलंय, अशी भावना त्यांच्यात निर्माण होऊ नये, यासाठीच एक रुपया घेण्याची कल्पना निश्चित करण्यात आली. या ठिकाणी शर्ट, ट्राऊझर, टॉवेल आणि कुठलीही गोष्ट गरीबांना फक्त एका रुपयांत विकत घेणं शक्य होतं.
इमॅजिन ट्रस्ट नावाने चार मित्रांनी ही संस्था केली सुरू
2013 साली इमॅजिन ट्रस्ट नावानं चार मित्रांनी ही संस्था सुरू केली. त्यानंतर मेलिशा नावाची एक तरुणी या संस्थेत सहभागी झाली. तिने पुढाकार घेतल्यामुळे संस्थेच्या कामाचा आवाका वाढवला आणि मोठ्या प्रकल्पांना हात घालायला सुरुवात केली. त्यांना मिळणाऱ्या देणग्यांमधून ते उत्तम प्रतिचे कपडे विकत घेतात आणि केवळ एका रुपयात गरीबांना उपलब्ध करून देतात. या कल्पनेचं बंगळुरूसह देशभरात कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.