नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,33,16,755 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 27,176 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 284 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,43,497 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच अनेक आजार समोर येत आहेत. अशातच बिहारमध्ये व्हायरल फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने एका बेडवर तीन लहान मुलांवर उपचार होत आहेत. रुग्णालयात बेडच नसल्याने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
बिहारच्या भागलपूरमध्ये असलेल्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रुग्णालयात व्हायरल फिव्हरवर अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने एका बेडवर तीन चिमुकल्यांना ठेवण्यात आलं आहे. प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. रुग्णालयात सातशेहून अधिक बेड आहेत. पण सध्या व्हायरल फिव्हरचा कहर असल्याने बेडच शिल्लक नसल्याचं चित्र आहे. मंगळवारी शिशू विभागामध्ये 71 लहान मुलांवर उपचार करण्यात आले. यातील 45 मुलं व्हायरल फिव्हरमुळे रुग्णालयात दाखल झाली आहेत. त्यांची काळजी घेण्यात येत आहे. व्हायरल फिव्हर हा कोरोनाचा साईड इफेक्ट असल्याची माहिती आता समोर आली आहे.
बिहारमध्ये 25 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. अचानक व्हायरल फिव्हरच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मुझफ्फरपूर, चंपारण, गोपाळगंज, सीवान आणि मधुबनीसह अनेक राज्यात व्हायरल फिव्हरने थैमान घातले आहे. गेल्या एक महिन्यात जवळपास 25 मुलांनी आपला जीव गमावला आहे. तर अनेकांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं म्हटलं जात असताना या आजारामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटणाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयातील सर्व बेड्स फुल झाले आहेत. आरोग्य विभागाने अलर्ट देखील जारी केला आहे.
'कोरोनाचा साईड इफेक्ट आहे व्हायरल फिव्हर'
आरोग्य विभागाने आपल्या काही टीम तयार केल्या असून त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य मंत्र्यांनी देखील या सर्व परिस्थितीवर आपलं लक्ष असल्याचं म्हटलं आहे. तसेच सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं देखील म्हटलं आहे. मुलांवर योग्य उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाटणामध्ये व्हायरल फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. सरकारी रुग्णालयात तर एकही बेड शिल्लक नाही. डॉक्टरांनी व्हायरल फिव्हर हा कोरोनाचे साईड इफेक्ट असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे. रोज अनेक मुलांना उपचारासाठी रुग्मालयात आणण्यात येत आहेत. मात्र रुग्णांसाठी जागाच शिल्लक नसल्याने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.