नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असताना सोशल मीडियावर अनेक चुकीचा संदेश देणारे मेसेज शेअर केले जात आहे. एखाद्या मेसेजबाबत कोणतीही पडताळणी न करता तो तसाच दुसऱ्यांना पाठवला जातो. सध्या असाच एक मेसेज आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डॉक्टर आयशाचा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंडिग होत आहे. डॉक्टर आयशाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र ती कोरोनाला हरवू शकली नाही आणि ईदच्या दिवशी तिने शेवटचा श्वास घेतला. जगाचा निरोप घेताना ती लोकांसाठी एक संदेश आणि हास्य सोडून गेली, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती.
17 जुलै रोजी आयशाचा वाढदिवस होता. तिने आपला वाढदिवस खूप आनंदात साजरा केला. त्याचा एक व्हिडीओ आयशा नावाच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ती वाढदिवस साजरा करीत असल्याचे दिसत आहे. तिच्या त्या फोटोमध्ये ती अत्यंत आनंदात दिसत आहे. ट्विटरवर तिने एक संदेशही लिहिला आहे. त्यात आयशा म्हणाली की, हाय फेंड्स..मी कोरोनाशी नाही लढू शकत. आज कोणत्याहीक्षणी मी व्हेंटिलेटरवर जाऊ शकते. मला आठवणीत ठेवा. तुमच्यासाठी माझी स्माइल...तुमच्या मैत्रीसाठी खूप आभार...तुमची खूप आठवण येईल..सुरक्षित राहा...या जीवघेण्या व्हायरसला गांभीर्याने घ्या, असं म्हणत आयशाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र या व्हिडिओ आणि फोटोमागील सत्य आता समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर आयशाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तसेच ट्विटरवर आशयाचा कोरोनामुळे मृ्त्यू झाला असल्याचा दावा देखील करण्यात आला होता. मात्र आयशाचे फोटो आणि व्हिडिओ दोघेही बनावट असल्याची माहिती समोर आली आहे.
डॉक्टर अमरिंदर नावाच्या एका ट्विटर यूजरने डॉक्टर आयशा आताच डॉक्टर झाली होती.17 जुलैला तिने वाढदिवस साजरा केला. ईदच्या दिवशी आपल्या सुंदर स्माइलने तिने जगाचा निरोप घेतला, असं म्हटलं होतं. मात्र अमरिंदर यांनी हे ट्विट आता हटवलं आहे. तसेच आयशाच्या नावाचं ट्विटरवर असलेलं अकाऊंट देखील डिलिट करण्यात आलं आहे.
निधी रजधान या ट्विटर यूजरने देखील आयशाच्या मृत्यू संदर्भात ट्विट केले होते. मात्र काही वेळेनंतर तिने स्वत: हे ट्विट हटवून ही बातमी खोटी असल्याचं जाहीर केलं आहे.