मध्यप्रदेशमध्ये लोकायुक्तच्या टीमने टाकलेल्या धाडीत मोठं घबाड सापडलं आहे. मंगळवारी पहाटे बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी कारवाई करण्यात आली. भोपाळच्या पथकाने एका निवृत्त स्टोअर किपरच्या निवासस्थानी धाड टाकली. सेवानिवृत्त स्टोअर किपर १० कोटींहून अधिक मालमत्तेचा मालक निघाला. मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त स्टोअर किपरविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीमुळे भोपाळ आणि विदिशा जिल्ह्यातील लाटेरी येथील त्यांच्या घरावर आणि विविध मालमत्तांवर छापे टाकण्यात आले.
सेवानिवृत्त स्टोअर किपर १० कोटींहून अधिक मालमत्तेचे मालक असल्याची माहिती मिळाली. लोकायुक्त एसपी मनू व्यास यांनी दिलेली माहिती अशी, 'अशफाक अली रहिवासी लटेरी, हे पूर्वी जिल्हा रुग्णालयात राजगडमध्ये स्टोअर कीपर म्हणून काम करत होते.बेहिशोबी मालमत्तेची तक्रार आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे १६ हून अधिक स्थावर मालमत्तांची माहिती मिळाली असून भोपाळ-विदिशा आणि लाटेरी येथे ५० हून अधिक स्थावर मालमत्तांबाबत तपास सुरू आहे.
आतापर्यंतच्या तपासात आरोपी आणि कुटुंबीयांच्या नावे अनेक जंगम मालमत्ता खरेदीशी संबंधित नोंदी प्राप्त झाल्या आहेत. याची किंमत सुमारे १.२५ कोटी रुपये आहे. लाटेरी, विदिशा आणि भोपाळमध्ये ५० हून अधिक स्थावर मालमत्तांच्या संदर्भात माहिती गोळा केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशफाक अली स्टोअर कीपरच्या पदावरून निवृत्त झाले तेव्हा त्यांचा पगार सुमारे ४५,००० रुपये होता, पण छाप्यामध्ये सापडलेली मालमत्ता, रोख रक्कम आणि दागिने त्यांच्या उत्पन्नापेक्षा कित्येक पटीने जास्त आहेत. लाटेरी येथे आरोपीचे १४००० स्क्वेअर फुटांचे बांधकाम सुरू असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स सापडले आहे.
लाटेरी येथेच तीन मजली इमारतही आढळून आली असून, त्यातच शाळा सुरू आहे. छाप्यादरम्यान घरातून सुमारे ४६ लाख रुपये किमतीचे दागिने आणि सोने-चांदीसह सुमारे २० लाखांची रोकडही सापडली. ही रोकड घराच्या आत एका पिशवीत होती. ही रक्कम मोजण्यासाठी मशीन आणावे लागले. लोकायुक्त टीमने भोपाळच्या एअरपोर्ट रोडवर असलेल्या घरावर छापा टाकला तेव्हा घराचे आलिशान आतील भाग पाहून थक्क झाले. मॉड्युलर किचन, लाखो रुपयांचे झुंबर, फ्रीज आणि टीव्हीशिवाय महागडे सोफे आणि शोकेसही होते.