बिहारमधील गया जिल्ह्यात परीक्षा सुरू झाली आहे. त्यापैकी एका केंद्रावर अजब घटना समोर आली आहे. ५००० मुलींमध्ये बसून एकटाच मुलगा परीक्षा देत आहे. रॉकी असं या मुलाचं नाव असून त्याने सांगितलं की त्याला यामुळे खूप अस्वस्थ वाटत होतं. परंतु वर्ष वाचवण्यासाठी त्याला अशा परिस्थितीत परीक्षा द्यावी लागली.
शेरघाटीचं एसएमजीएस कॉलेज हे मुलींसाठी परीक्षा केंद्र बनवण्यात आलं होतं, परंतु तांत्रिक बिघाडामुळे रॉकीच्या हॉलतिकिटवर 'महिला' असं नोंदवण्यात आलं आहे. या कारणास्तव त्याला या परीक्षा केंद्रावर पाठवण्यात आलं. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी ही एक सामान्य चूक असल्याचं म्हटलं आणि ती नंतर दुरुस्त करता येईल असं सांगितलं.
आम्स येथील सरकारी हायस्कूलमधून मॅट्रिकच्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या रॉकी कुमारच्या हॉलतिकिटवर चुकून त्याचं लिंग 'महिला' असं नोंदवण्यात आलं होतं. सहसा, मुलांसाठी परीक्षा केंद्र गया शहरात आणि मुलींसाठी शेरघाटी येथे असतं. परंतु या चुकीमुळे, रॉकीला ५००० मुलींमध्ये परीक्षा देण्यासाठी पाठवण्यात आलं.
रॉकीने सांगितलं की, मुलींसोबत परीक्षा देताना त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि अनेक विद्यार्थिनी त्याच्यावर हसायलाही लागल्या. त्याने कोणतीही चूक केली नव्हती, परंतु हॉलतिकीट दुरुस्ती इतक्या लवकर शक्य नव्हती, म्हणून त्याला या केंद्रावर परीक्षेला बसावं लागलं.