कोलकाता : एखाद्या तरूणीचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणं बलात्काराप्रमाणे आहे, असा प्रकार म्हणजे व्हर्चुअल बलात्कार मानला जाईल , असं पश्चिम बंगालमधील एका न्यायालयाने म्हटलं आहे. रिव्हेंज पॉर्नच्या ( बदला घेण्यासाठी एखाद्याचे अश्लील फोटो व्हायरल करणं) एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान निर्णय देताना न्यायालयाने खासगी फोटो व्हायरल करणं हा बलात्काराइतकाच गंभीर गुन्हा आहे असं मत व्यक्त केलं.या प्रकरणात इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिकणा-या एका विद्यार्थ्याला न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा दिली आहे. तसंच दोषीला 9 हजार रूपयांचा दंड देखील ठोठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांमध्ये न्यायालयाने या प्रकरणात निर्णय दिला. देशाच्या न्यायव्यवस्थेत सर्वाधिक लवकर आलेल्या निर्णयांपैकी हा एक निर्णय आहे असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. काय आहे प्रकरण -बी.टेकच्या विद्यार्थ्याची इंटरनेटवर एका तरूणीशी ओळख झाली. तीन वर्ष सोशल मीडियावर दोघांची मैत्री होती. तरूणीचा विश्वास जिंकून त्याने तिच्याकडे खासगी फोटोंची मागणी केली. कालांतराने त्याने शारीरीक संबंध ठेवण्याची मागणी तिच्याकडे केली. तरूणीने विरोध केल्यानंतर त्याने तिला त्रास देण्यास सुरूवात केली आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.