मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष जेआरडी टाटा यांचे किस्से खूप प्रसिद्ध आहेत. सर्वांना मदत करणारा अवलिया म्हणून त्यांना ओळखले जात होते. लोकांना मदत करणे त्यांना आवडत असे. त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती केआर नारायणन यांचीही मदत केली होती. या मदतीमुळे केआर नारायणन यांचे स्वप्न पूर्ण झाले होते. यासंदर्भातील एक पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, 1992 मध्ये केआर नारायणन भारताचे उपराष्ट्रपती होते, तर 1997 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती होते. (Viral Post Shows How JRD Tata's Facilitated Former President K. R. Narayanan's Dream)
शिष्यवृत्तीसाठी मदत केलीहरीश भट जे टाटा सन्सचे ब्रँड कस्टोडियन आहेत, त्यांनी जेआरडी टाटा यांनी केलेल्या मदतीची पोस्ट सोशल मीडियातील लिंकडनवर केली आहे. या पोस्टनुसार, जेआरडी टाटा यांना शिष्यवृत्तीसाठी एका युवकाची शिफारस करण्याचे पत्र मिळाले, तेव्हा त्या काळात कोणालाही ठाऊक नव्हते की, तो युवक पुढे जाऊन एके दिवशी भारताचा राष्ट्रपती होईल. तो युवक म्हणजे केआर नारायणन होते.
केआर नारायणन अत्यंत गरीब कुटुंबातून आले होते. त्यांच्या वडिलांची महिन्याला फक्त 20 रुपयांची कमाई होती. त्यांच्या कुटुंबात 9 सदस्य होते. लंडनमध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी केआर नारायणन यांनी जेआरडी टाटा यांच्याकडे शिष्यवृत्तीसाठी शिफारस केली होती. शिफारसीचे पत्र मिळाल्यानंतर जेआरडी टाटा यांनी केआर नारायणन यांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी जेएन टाटा एंडोमेंटला केआर नारायणन यांची मदत करण्यासाठी शिफारस केली.
जेएन टाटा एंडोमेंटची स्थापना 1892 मध्ये जमशेदजी नुसरवान जी टाटा यांनी केली होती. याअंतर्गत युवकांना शिष्यवृत्ती दिली जात होती, जेणेकरून युवक परदेशात शिक्षण घेतील. जेआरडी टाटा यांच्या शिफारशीनंतर केआर नारायणन यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यामध्ये ते उत्तीर्ण झाले आणि याअंतर्गत त्यांना 16 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच, एक हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले.
1997 मध्ये केआर नारायणन भारताचे राष्ट्रपती बनले होतेशिष्यवृत्ती मिळाल्यानंतर केआर नारायणन यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला. जेआरडी टाटा यांनी केलेल्या मदतीमुळे केआर नारायणन यांचे लंडनमध्ये जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. यानंतर 1949 मध्ये ते भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले. 1992 मध्ये केआर नारायणन भारताचे उपराष्ट्रपती झाले आणि 1997 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले.