व्हायरल सत्यः शहिदांना श्रद्धांजली वाहताना राहुल गांधी खरंच मोबाइलमध्ये बिझी होते?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:23 PM2019-02-18T12:23:48+5:302019-02-18T12:30:10+5:30
पुलवामा हल्ल्यात भारतमातेच्या 40 जवानांना वीरमरण आलं.
नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यात भारतमातेच्या 40 जवानांना वीरमरण आलं. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यासंदर्भात सोशल मीडियावरही बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसंदर्भात अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत असताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे अभिनेते आणि खासदार परेश रावल यांनीही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत असतानाच राहुल गांधी फोनवर बोलत असल्याचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक मजकूरही लिहिला आहे. राहुल गांधी शहिदांना योग्य सन्मान देऊ शकत नाहीत. एकीकडे पूर्ण देश शहीद जवानांसाठी अश्रू ढाळत आहेत आणि राहुल गांधी श्रद्धांजली देण्याऐवजी फोनवर बिझी आहेत. Bharat Positive या फेसबुक पेजवरून राहुल गांधी श्रद्धांजली वाहत असतानाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्येही राहुल गांधी राहुल गांधी फोनवर बिझी असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांनी शेअर केलं आहे. तसेच 3 लाखांहून अधिक युजर्सनं हा व्हिडीओ पाहिला आहे.
— Paresh Rawal (@SirPareshRawal) February 15, 2019
नेमकी खरी बाब काय ?
राहुल गांधी यांनी श्रद्धांजली सभेत फोनचा वापर केल्याचं खरं आहे. परंतु शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून झाल्यानंतर त्यांनी फोनचा वापर केला होता.
कशी केली खातरजमा?
टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीच्या यू ट्युब चॅनलवर हा श्रद्धांजली सभेचा पूर्ण व्हिडीओ आहे. या व्हिडीओच्या 31 मिनिटांच्या 40व्या सेकंदाला राहुल गांधींनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यानंतर 31 मिनिटांच्या 57व्या सेकंदाला लष्करी अधिकाऱ्यांबरोबर राहुल गांधी रांगेत उभे होते. त्यानंतर 45मिनिटाच्या 35व्या सेकंदाला राहुल गांधींनी खिशातून फोन बाहेर काढला आणि मेसेज पाहिले. त्यावेळी त्यांच्या बाजूला लष्कर प्रमुख बिपीन रावत, केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड, निर्मला सीतारामण, राजनाथ सिंह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिसत आहे.