छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना घडली. हॉटेलमध्येलग्नाच्या स्टेजवर जाताना हार्नेस तुटल्याने वधू आणि वर दोघेही स्टेजवर कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत त्यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर, इव्हेंट कंपनीने आपली चूक मान्य केली असून घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. हे प्रकरण तेलीबांध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
12 फूट उंचावरून कोसळले नवरदेव-नवरी -खरे तर, वधू-वरांना हार्नेसच्या माध्यमातून मंचावर आणले जात होते. मात्र हार्नेस अचानक तुटल्याने वधू-वर 12 फूट उंचीवरून खाली कोसळले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. केवळ वधू आणि वराला किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर पाहुण्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी आपला राग इव्हेंट कंपनीवर काढला.
...अन् सर्वत्र एकच आरडाओरड सुरू झाली -ही घटना तेलीबांध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घडली. लग्नाच्या कार्यक्रमाची जबाबदारी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे देण्यात आली होती. सर्व काही ठीक सुरू होते. लोक नाचण्याचा आणि खाण्याचा आनंद लुटत होते. वधू आणि वराला गोल रिंगमधून हार्नेसच्या सहाय्याने खाली स्टेजवर उतरवले जात होते. लग्नात उपस्थित सर्वांच्या नजरा केवळ आकाशातून स्टेजवर उतरत असलेल्या वधू-वरांच्या एंट्रीवर होते. याच वेळी हार्नेस तुटला आणि वधू-वर धडकन खाली कोसळले आणि सर्वत्र एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड सुरू झाली. या घटनेनंतर, उपस्थित लोक प्रचंड संतापले होते आणि त्यांनी आपला राग इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर काढला.