सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओद्वारे असा दावा केला जातोय की एका आयएएस अधिका-याच्या मुलीच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींसमोर राष्ट्रपतींचा अपमान केला गेला असा दावा या व्हिडीओत करण्यात आला. व्हिडीओमध्ये ज्यांना राष्ट्रपती सांगितलं जात आहे त्यांना पुढे येण्यास सांगितलं जातं. ते पुढे येतात आणि पंतप्रधानांच्या बाजूला उभे राहतात. यावरून राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. खरं म्हणजे राष्ट्रपती अथवा पंतप्रधान खासगी कार्यक्रमात असो किंवा अधिकृत कार्यक्रमात दोन्ही ठिकाणी प्रोटोकॉल लागू असतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी राष्ट्रपती आणि पंतप्रधान दोघंही असतील तर प्रथम राष्ट्रपतींचा सन्मान होतो त्यानंतर पंतप्रधानांचा. पंतप्रधान मोदी 6 नोव्हेंबर रोजी तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या दौ-यावर होते. येथील वृत्तपत्र डेली थांतीच्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या दरम्यान चेन्नईमध्ये पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख करूणानिधी यांचीही भेट घेतली. याच दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालयाचे ज्येष्ठ अधिकारी डॉ. टीव्ही सोमनाथन यांच्या मुलीच्या लग्नसमारंभात सहभागी झाले होते. या व्हायरल व्हिडीओमध्ये ज्यांना देशाचे राष्ट्रपती सांगितलं जात आहे ते तामिळनाडूचे गव्हर्नर बनवारी लाल आहेत. ज्या दिवशीची ही घटना आहे त्या दिवशी राष्ट्रपती कोविंद हे छत्तिसगडमध्ये होते.
व्हिडीओ -