चेन्नई : तामिळनाडूच्या तिरपूर जिल्ह्यात रविवारी घडलेल्या दलित तरुणाच्या निर्घृण हत्याकांडाची चित्रफीत वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून प्रसारित झाल्याने सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. हे हत्याकांड आॅनर किलिंगचा प्रकार असल्याचा संशय आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपी (मृत तरुणाचा सासरा) चिन्नास्वामी याने डिंडीगल जिल्ह्यातील निलाकोटाईच्या एका न्यायालयात आत्मसमर्पण केले. रविवारी तिरपूरच्या उदमलपेट बसस्थानकावर शंकर (वय २२) आणि त्याची पत्नी कौशल्या हे दोघे बसची वाट बघत उभे असताना मोटरसायकलवर आलेल्या तीन सशस्त्र हल्लेखोरांनी या दोघांवर निर्घृण हल्ला चढवला. मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या लोकांसमोर गुंडांनी शंकर आणि कौशल्यावर घातक शस्त्राचे सपासप घाव घालून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले आणि पळून गेले. वर्दळीच्या रस्त्यावर हा हल्ला झाला. मात्र, गुंडांच्या हातातील शस्त्र बघून कुणीही शंकर आणि कौशल्याच्या मदतीला धावण्याचे धाडस दाखविले नाही, असे प्रसारित झालेल्या चित्रफितीत दिसत आहे. या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच राजकीय क्षेत्रातूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तामिळनाडू काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ईवीकेएस इलनगोवन, डावे पक्ष, एमडीएमके, व्हीसीके आणि डीके या पक्षांनीसुद्धा या घटनेचा निषेध करून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)