नवी दिल्ली - ओडिशामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी रुग्णाला ठीक करण्याऐवजी मारहाण केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातील धर्मगड उपविभागीय रुग्णालयात डॉक्टरांनी एका रुग्णाला बेदम मारहाण केल्याची अजब घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये डॉक्टर रुग्णाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. डॉक्टरांनी रुग्णाला चपलेने मारहाण केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
रुग्णाला लाठ्या-काठ्यांनी देखील बेदम मारहाणही करण्यात आली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकरणी स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहाच्या सुमारास परिसरातील एक व्यक्ती पोटात प्रचंड दुखत असल्याच्या तक्रारीमुळे उपचारासाठी रुग्णालयात गेला होता. रूग्णालयात गेल्यानंतर तिथे कोणीही डॉक्टर न दिसल्याने त्याने आरडाओरडा सुरू केला. यानंतर रूग्णालयातील डॉक्टर शैलेश कुमार डोरा यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर डॉक्टर डोराने रुग्णाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
मुकेश नाईक असं या रुग्णाचं नाव आहे. मुकेशने पोटात असह्य दुखू लागल्याने मी रुग्णालयात गेलो तेव्हा माझी काळजी घेण्यासाठी एकही डॉक्टर तेथे उपस्थित नव्हता असा आरोप केला आहे. तसेच मी सुरक्षा रक्षकाला विचारले असता त्याने सांगितले की, डॉक्टर वॉशरूमला गेले आहेत. काही वेळाने वैद्यकीय कर्मचार्यांपैकी एकाने इंजेक्शन दिलं. मी स्ट्रेचरवर होतो. त्यावेळी डॉक्टर अचानक माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली असं म्हटलं आहे.
रुग्णालयातील डॉक्टरांच्या अशाप्रकारच्या वागण्याचा सर्वांनाच धक्का बसला आहे. डॉक्टरांच्या अटकेच्या मागणीसाठी रुग्ण आणि स्थानिक लोकांनी सोमवारी रास्ता रोकोही केला. डॉक्टर आणि रुग्णाच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल केला असून या घटनेबाबत डॉक्टरांना ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.