मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्याठिकाणी एक मुलगी वडिलांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मदतीची याचना करत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांसह अन्य अधिकाऱ्यांना तब्बल ८००-९०० कॉल केले तरीही त्या मुलीच्या मदतीसाठी कोणी सरसावलं नाही. या मुलीचे वडील ब्लॅक फंगस आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर ग्वालियरच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित रुग्णाच्या मुलीने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मदतीसाठी विनंती केली. या मुलीने व्हिडीओ जारी करत म्हटलंय की, मुख्यमंत्री जी, प्लीज माझ्या वडिलांच्या उपचारासाठी मदत करा आणि इंजेक्शनची व्यवस्था करा. आमच्या कुटुंबीयांना मदतीची गरज आहे असं तिने विनवणी केली आहे. मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसनंतर आता ब्लॅक फंगस आजाराने डोके वर काढलं आहे. राज्यात म्युकरमायकोसिसच्या आजारासाठी लागण्यात येणाऱ्या इंजेक्शनचाही तुटवडा आहे.
माझ्या वडिलांची तब्येत खूप नाजूक आहे. ब्लॅक फंगसमुळे त्यांचा एक डोळा काढावा लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यासाठी आम्हाला मदतीची गरज आहे. ग्वालियरमध्ये ब्लॅक फंगस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यातील अनेक रुग्ण या महामारीच्या विळख्यात अडकले आहेत. त्यात उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा अभाव प्रखरतेने दिसून येत आहे. या कठीण काळातही काही जण काळाबाजार करून रुग्णांच्या नातेवाईकांना लुटण्याचे प्रकार सुरूच आहेत.
दुसरीकडे या मुलीचा व्हिडीओ व्हायर झाल्यानंतर आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांनी या प्रकरणाची दखल तात्काळ मुलीच्या वडिलांसाठी इंजेक्शनची व्यवस्था केली. सध्या ग्वालियारमध्ये इंजेक्शन उपलब्ध नाहीत. त्यामुळे भोपाळवरून हे इंजेक्शन मागवता येतंय यासाठी संपर्क केला आहे. मुंबईहून इंजेक्शन मध्य प्रदेशसाठी निघाले आहेत. ते लवकरच ग्वालियरमध्ये पोहचतील. त्यानंतर सर्वात पहिलं या मुलीच्या वडिलांना इंजेक्शन देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आरोग्य विभागाच्या दाव्यानुसार, एका रुग्णाला ६० इंजेक्शन लावले जातात. त्यामुळे त्याचा तुटवडा होत असल्याची समस्या उभी राहत आहे. परंतु लवकरच व्यवस्था केली जाईल. गंभीर रुग्णांना आधी इंजेक्शनचा पुरवठा होईल. रेणुचे वडील मागील ८ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. ब्लॅक फंगसमुळे त्यांचा एक डोळा निकामी झाला आहे. त्यांना दिवसाला ६-७ इंजेक्शनची गरज आहे.