MP Police Video :मध्य प्रदेशातपोलिसांच्या क्रूरतेचा चेहरा समोर आणणारा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील या व्हिडीओमध्ये एक महिला आणि एका अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण केली जात आहे. हा धक्कादायक व्हिडिओ पोलीस ठाण्यातील आहे. चोरीच्या संशयावरून, महिला अधिकाऱ्याने आधी महिलेला काठीने मारहाण केली. त्यानंतर आईला वाचवायला गेलेल्या मुलालाही महिला अधिकाऱ्याने जबर मारहाण केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कठोर पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या आदेशानंतर पोलीस ठाण्याच्या प्रमुखासह पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील कटनी पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्हीमधून समोर आलेल्या व्हिडीओमधून गेल्या दोन दिवसांपासून खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात महिला अधिकारी आणि इतर कर्मचारी महिला आणि एका मुलाला काठीने मारहाण करताना दिसत आहे. दोघेही हात जोडून विनवणी करत आहेत. पण पोलिसांनी कोणतीही दया माया न दाखवता दोघांनाही मारहाण सुरुच ठेवली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जबलपूर रेल्वे पोलिसांनी भाष्य केलं. कटनी रेल्वे स्थानक प्रभारी अरुणा वहाणे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही घटना गेल्या वर्षीची आहे. कटनीच्या झारा टिकुरिया परिसरातील गुन्हेगार दीपक वंशकर याच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले असताना हा सगळा प्रकार घडला. व्हिडिओमध्ये दीपकची आई आणि त्याच्या अल्पवयीन मुलाला मारहाण होताना दिसत आहे. व्हिडिओत बेदम मारहाण होत असलेल्या महिला अधिकारी कटनी जीआरपी स्टेशन प्रभारी अरुणा वहाणे आहेत. दीपक वंशकर याला पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवले. त्याच्यावर जीआरपी पोलिस ठाण्यात कटनीमध्ये १९ गुन्हे दाखल आहेत. तो रेल्वे पोलिसांच्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत होता आणि त्याच्यावर १० हजारांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. दीपकच्या कुटुंबीयांवरही चोरीच्या घटनांमध्ये त्याला साथ दिल्याचा आरोप होता. या कारणावरून त्याच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते.
दीपकच्या आईने काय सांगितले?
"पोलाीस मला घेऊन गेले. मला सांगण्यात आले की वरिष्ठ अधिकाऱ्याने मला बोलावले आहे. तिथे पोहोचल्यावर मला विचारले गेले की माझा मुलगा कुठे आहे. मी त्यांना सांगितले की तो कुठे आहे हे मला माहित नाही. मी त्यांना सांगितले की त्याला पकडा, त्याला मारा तुम्हाला पाहिजे ते. त्यांनी मला माहिती विचारली आणि नंतर सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या आणि मला प्लास्टिकच्या काठीने मारहाण केली. त्यांनी(अरुणा वहाणे) मलाही लाथ मारली आणि धक्काबुक्की केली. मला रात्रभर मारहाण करण्यात आली. मी पाणी मागितल्यावर मला पुन्हा मारहाण करण्यात आली. माझा नातू माझ्यासोबत होता. त्याला इतरत्र नेऊन मारहाण करण्यात आली," असे दीपकच्या आईने सांगितले.
दरम्यान, जुना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. व्हिडीओ फुटेजवरुन मिळालेल्या माहितीनंतर आणि प्राथमिक तपासानंतर स्टेशन प्रभारी जीआरपी कटनी, एक हेड कॉन्स्टेबल आणि चार कॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात असे गैरप्रकार होऊ नयेत, असे निर्देशही मोहन यादव यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.