नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेक राज्यातील काँग्रेस नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री विरप्पा मोईली यांनी काँग्रेस पक्षाला मोठ्या सर्जरीची गरज व्यक्त केली आहे.
मोईली म्हणाले की, काँग्रेसला १३५ वर्षांचा इतिहास आहे. अनेकदा लोकांनी काँग्रेसचे अस्तित्व संपल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्येकवेळी ते चुकीचे ठरले आहेत. इंग्रजांनी देखील काँग्रेस संपल्याचा दावा केला होता. परंतु, त्यानाच भारत सोडून पळून जावं लागलं आहे. १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांच्या पराभवानंतर काँग्रेस संपली असं अनेकजण म्हणत होते. तरी देखील आम्ही पुन्हा एकदा सत्तेत परतलो. लोक इतिहास विसरून काँग्रेस संपल्याचा दावा करतात. निश्चितच काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. परंतु, काँग्रेस पुनरागमन नक्की करणार, असा विश्वास देखील मोइली यांनी व्यक्त केला.
राहुल यांच्या नेतृत्वावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर मोईली यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल यांनी पक्षाचे उत्तम पद्धतीने नेतृत्व केले. काँग्रेसला त्याचा लाभ घेता आला नाही. काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल अशी स्थिती राहुल यांनी निर्माण केली होती. त्यांचं नेतृत्व निवडणुकीच्या वेळी आणि निवडणुकीपूर्वी चांगले होते तर आता का नाही, असा सवालची मोईली यांनी उपस्थित केला.
दरम्यान पराभवाचे उत्तर देण्याची राहुल यांची जबाबदारी नसून काँग्रेसच्या इतर नेत्यांची आहे. ज्या राज्यांत आम्ही पराभूत झालो, तेथील प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची जबाबदारी निश्चित व्हावी. इतर नेत्यांनी देखील नैतिक जबाबदारी घ्यावी, असं मोईली यांनी म्हटले. तसेच दारुण पराभव आणि अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी सर्जरी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.