Virat Kohli Reaction on Odisha Train Accident: ओडिशामध्ये काल संध्याकाळी ७ च्या सुमारास झालेल्या रेल्वेअपघाताने संपूर्ण देश हादरला. या अपघाताने अनेक कुटुंबांना एका झटक्यात आयुष्यभराच्या वेदना दिल्या. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अपघाताचे व्हिडिओ साऱ्यांना हादरवून सोडणारे आहेत. या अपघातात आतापर्यंत 230 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर अद्यापही बचावकार्य सुरू आहे. बचाव आणि मदत कार्यात अनेक जखमींना कटक, भुवनेश्वर आणि बालासोर येथील रुग्णालयात हलविण्यात येत आहे. ही घटना ऐकून इतरांप्रमाणेच टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीही हादरला आहे.
कोहली सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी इंग्लंडमध्ये आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आयपीएलमधील प्रवास लीग टप्प्यात संपल्यानंतर तो इंग्लंडला रवाना झाला, जिथे कोहली अंतिम सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. पण त्याच दरम्यान भारतातील या मोठ्या रेल्वे अपघाताची बातमी ऐकून त्याला वेदना झाल्या. त्यांने शनिवारी ट्विट केले की ओडिशातील वेदनादायक रेल्वे अपघाताबद्दल ऐकून वाईट वाटले. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, माझ्या प्रार्थना व सहवेदना त्या कुटुंबांसोबत आहेत. कोहली पुढे म्हणाला की, अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो हीच प्रार्थना.
गौतम गंभीरचेही ट्विट
या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ईश्वर शक्ती देवो, असे ट्विट गौतम गंभीरने केले आहे. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे, अशा शुभेच्छा देत संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे तो म्हणाला.
दरम्यान, या अपघातानंतर ओडिशातील नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडवले. या दुर्घटनेतील जखमी रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या जखमींचा जीव वाचवण्यासाठी ओडिशावासीयांनी अत्यंत कौतुकास्पद कार्य सुरू केले. जखमींना रक्ताची गरज असल्याने लोकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटलबाहेर रांगा लावल्या. आपल्या रक्तामुळे लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सारेच पुढाकार घेताना दिसले. सरकारने रक्त देण्याचे आवाहन न करता स्वंयस्फूर्तीने लोकांनी रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटल गाठले आणि माणुसकीचे दर्शन घडवले.