नवी दिल्ली, दि. 8 - हरियाणामधील चर्चित छेडछाड प्रकरणी निष्पक्ष तपास व्हावा अशी मागणी करत भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागदेखील मैदानात उतरला आहे. आयएएस अधिका-याची मुलगी वर्णिकासोबत हरियाणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलाने केलेल्या छेडछाड प्रकरणी विरेंद्र सेहवागने उपरोधिकपणे टीका करत सल्ला दिला आहे. सोशल नेटवर्किग साईटवर नेहमी सक्रिय असणा-या विरेंद्र सेहवागने ट्विट केलं आहे की, 'चंदिगडमधील ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. या घटनेचा निष्पक्ष तपास झाला पाहिजे. कायद्यात राहाला तर फायद्यात राहाल'.
काय आहे प्रकरण -हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला यास एका मुलीचा पाठलाग व छेडछाड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षांचा मुलगा कायद्याचा विद्यार्थी आहे. पीडित मुलगी आयएएस अधिका-याची मुलगी आहे. शुक्रवारी चंदीगडमधील सेक्टर 9 येथून चालली होती. तेव्हा एक टाटा सफारी कार पाठलाग करीत आहे, असे तिच्या लक्षात आले. तिने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी दोघांना अटक केली, तेव्हा ते दोघेही दारूच्या नशेमध्ये होते. हरिणाया भाजपाध्यक्ष सुभाष बराला यांनी दिल्लीतल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय संघटन महामंत्री रामलाल, हरिणाया भाजपाचे प्रभारी अनिल जैन आणि राष्ट्रीय महासचिव कैलास विजय वर्गीस यांची भेट घेतली आहे.
हरियाणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. छेडछाड प्रकरणात सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याच्या विरोधात आता भाजपामधून सूर उमटू लागले आहेत. भाजपाच्या एका खासदारानं नैतिकतेच्या मुद्द्यावर बराला यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. तर भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी विकास बराला याला नशेत आकंठ बुडालेला गुंड म्हणत त्याच्याविरोधात याचिका दाखल करण्याची घोषणा केली आहे.
कुरुक्षेत्रातील भाजपाचे खासदार राजकुमार सैनी म्हणाले आहेत की, बराला यांनी पक्ष कारवाईची वाट न पाहता तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. भाजपानंच बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा दिला आहे. हा कोणत्याही साधारण व्यक्तीवर नव्हे, तर पार्टी अध्यक्षाच्या मुलावर आरोप लावण्यात आला आहे. बराला यांनी तात्काळ पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. तर भाजपाचे खासदार किरण खेर म्हणाले होते की, कोणालाही एखाद्या मुलीला घाबरवण्याचा कोणताही अधिकार नाही. काँग्रेसही या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. काँग्रेसनं हरिणायाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालय हरियाणा भाजपाचे अध्यक्ष आणि त्यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. चंदीगड सरकार आणि पोलीस दोन्ही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत आहे, असंही काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले आहेत. त्यामुळे विकास बराला याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात पोलिसांवरही नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप केला जातोय. पोलिसांनी या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी कायदेशीर सल्ल्याची मागणी केली आहे. पोलिसांनी मुलीची तक्रार आणि न्यायालयाच्या सीआरपीसी कलम 164 अंतर्गत कायदेशीर सल्ल्यासाठी पाठवलं आहे.