नवी दिल्लीः क्रिकेटच्या मैदानावर आणि ट्विटरच्या पीचवर बेधडक बॅटिंग करणाऱ्या वीरेंद्र सेहवागनं यावेळी संवेदनशीलतेचं आणि औदार्याचं दर्शन घडवलंय. तांदूळ चोरल्याच्या आरोपावरून हत्या करण्यात आलेल्या केरळमधील तरुणाच्या आईला वीरूनं दीड लाख रुपयांचा चेक पाठवला आहे.
२२ फेब्रुवारी रोजी केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या मधु (२७) या युवकाला जमावानं बेदम मारहाण केली होती. चोरीच्या संशयावरून स्थानिक तरुण मधुला मारहाण करत असताना, त्याला वाचवण्याऐवजी काही जण चक्क सेल्फी काढत होते. त्यानंतर, स्थानिकांनी मधुला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. पोलिसांच्या गाडीत मधुने उलटी केली होती. पोलिसांनी लगेचच त्याला जवळच्या आरोग्य केंद्रात नेलं, पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं.
मधुची मानसिक स्थिती ठीक नव्हती. तो दिवसभर जंगलात भटकायचा. त्याच्यावर झालेला चोरीचा आरोप, त्यावरून झालेली मारहाण आणि त्याचा मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेला होता. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा मधुच्या आईने घेतला होता. तिने आपलं सर्वस्वच गमावलं होतं. या आईच्या मदतीला वीरेंद्र सेहवाग धावून गेला आहे.
वीरेंद्र सेहवागनं मधुच्या कुटुंबाला दीड लाख रुपयांचा धनादेश पाठवला आहे आणि तो ११ एप्रिलला त्यांच्याकडे पोहोचेल, अशी माहिती समाजसेवक राहुल ईश्वर यांनी दिली. ही मदत मुलगा गमावलेल्या आईला थोडाफार आधार नक्कीच देईल. वीरूचा हा मनाचा मोठेपणा पाहून चाहते नक्कीच म्हणतीय, 'वाssह वीरू'!