नवी दिल्ली - भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याची पत्नी आरती सेहवागने फसवणूक झाल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बिझनेस पार्टनर्सनी खोट्या सह्या करुन साडेचार कोटींचं कर्ज घेतलं असा आरोप सेहवागच्या पत्नीने केला आहे. आरती सेहवाग यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये बिझनेस पार्टनर्सनी खोट्या सह्या करुन साडेचार कोटींचं कर्ज घेतल्याचं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरती सेहवागने रोहित कक्कर नावाच्या एका व्यक्तीसोबत बिझनेस पार्टनरशीप केली होती. रोहित हा दिल्लीतील अशोक विहारमध्ये राहत असून त्याच्यासोबत असलेल्या आणखी काही लोकांनी देखील फसवणूक केल्याचा आरोप आरती यांनी केला आहे. रोहित आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी आपल्याला विश्वासात न घेता एका बिल्डर फर्मशी संपर्क केला. वीरेंद्र सेहवाग आणि आरती सेहवाग आमच्यासोबत बिझनेस पार्टनर आहेत असं त्या फर्मला त्यांनी सांगितले.
रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आरती सेहवाग यांना याबाबत कोणतीही माहिती न देता या फर्मकडूनच साडेचार कोटींचे कर्ज घेतले आहे. 'रोहितसोबत जेव्हा माझी बिझनेस पार्टनरशीप झाली तेव्हा मला कल्पना दिल्याशिवाय कोणत्याही गोष्टी पुढे जाणार नाहीत हे मी स्पष्ट केलं होतं. मात्र या साडेचार कोटींच्या कर्जाबाबत मला काहीही माहित नाही' असं आरतीने सांगितलं आहे. त्यामुळेच यासाठी खोट्या सह्याही करण्यात आल्याचा आरोप आरती सेहवागने केला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी आरोपींविरोधात कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.