आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. "आमची मागणी आहे की, अरविंद केजरीवाल भ्रष्ट असून त्यांनी दिल्लीची लूट केली असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा. आप चोरांना वाचवत आहे. आमचा लढा हा दिल्लीतील जनतेचा लढा आहे."
"अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला लुटण्याचे काम केले आहे. अटकेत असलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी ठेवणे ही कोणती नैतिकता आहे? आम आदमी पक्षाने याचा विचार करावा आणि अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा" असं वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटलं आहे.
"जर अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 वर्षात जनतेची सेवा केली असती तर त्यांना आता हे बनावट पत्र देण्याची गरज पडली नसती. 8-9 वर्षात दिल्लीला पिण्याचे पाणी देऊ शकलो नाही. घाण पाणी येत असून गटारे ओसंडून वाहत आहेत. तुम्ही लोकांनी काय दिलं, दिल्ली लुटण्याशिवाय तुम्ही काहीही केलं नाही, ही चिंता आज तुरुंगात सतावत आहे."
"आणखी एक चिंतेची बाब आहे की, तिथे त्यांना आपल्या राजमहालाची आठवण येत आहे. ज्या सुविधा त्यांना तिथे मिळत होत्या त्या तुरुंगात दिल्या जात नाहीत. त्यामुळे ते अधिक त्रस्त आहे. मंत्री आतिशी आणि मंत्री सौरभ भारद्वाज यावर चर्चा करत नाहीत. त्यावर चर्चा व्हायला हवी" असं देखील भाजपा नेत्याने म्हटलं आहे.