पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (America President) जो बायडेन (Joe Biden) यांच्यासोबत ११ एप्रिल रोजी आभासी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांचे नेते दक्षिण आशिया, इंडो-पॅसिफिक तसंच जागतील मुद्द्यांवर सुरू असलेल्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतील आणि एकमेकांशी आपले विचार मांडतील.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine Crisis) सुरू असताना दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे. संयुक्त राष्ट्रात भारतानं तटस्थ भूमिका घेतली आहे. तर अमेरिका रशियाच्या विरोधात युक्रेनच्या बाजूनं उभा आहे. अशा परिस्थितीत रशिया आणि युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीवर दोन्ही देशांचे नेते चर्चा करू शकतात, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्या ही चर्चा भारतअमेरिका टू-प्लस-टू मंत्रीस्तरीय चर्चेपूर्वी होणार आहे. या चर्चेचं नेतृत्व भारताकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर करणार आहेत.