नवी दिल्ली : भारतातील वटवाघळांमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूंचा सध्या पसरलेल्या साथीशी काहीही संबंध नाही, असे इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेने गुरुवारी स्पष्ट केले. यासंदर्भात आयसीएमआरचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, ‘‘देशात वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले. मात्र माणसांना हानी पोहोचविण्याची क्षमता त्या विषाणूंमध्ये नव्हती, असे आयसीएमआरला तपासणीअंती लक्षात आले.’’
केरळ, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश ही तीन राज्ये व पुडुचेरी हा केंद्रशासित प्रदेश अशा चार ठिकाणी दोन प्रकारच्या वटवाघळांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले होते. वटवाघळांतून कोरोनाच्या विषाणूचे माणसात संक्रमण होणे, ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. ती दर हजार वर्षांतून फक्त एकदाच घडण्याची शक्यता असते, अशी माहिती आयसीएमआरच्या एका पाहणी अहवालात देण्यात आली.कोविड-१९च्या उगमाबाबत २ शक्यताडॉॅ. गंंगाखेडकर यांनी सांगितले की, चीनमधून कोविड-१९ या साथीच्या आजाराचा उगम कसा झाला असावा, याबद्दल जगभरात झालेल्या अभ्यासातून दोन शक्यता दिसून आल्या. वटवाघळांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळून येतात. माणसात संक्रमित होतील, असे कोरोनाचे विषाणू वटवाघुळाच्या शरीरात एकतर तयार झाले असावेत किंवा खवल्या मांजराच्या शरीरातील विषाणूंनी वटवाघळाच्या शरीरात प्रवेश करून मग त्यांचे संक्रमण मानवी शरीरात झाले असावे.