नवी दिल्ली : भारत सरकारने पाकिस्तानी हिंदू कुटुंबांना अस्थिकलश गंगेत विसर्जित करण्याची सुविधा दिली आहे. आतापर्यंत पाकिस्तानातील अशा हिंदू कुटुंबाला भारतात अस्थी विसर्जनाची परवानगी मिळायची, ज्याचा कोणीतरी सदस्य भारतात राहतो. आता धोरणात बदल केल्यानंतर, पाकिस्तानातील हिंदू कुटुंबांना गंगेत अस्थिकलश विसर्जित करण्यासाठी १० दिवसांचा भारतीय व्हिसा देण्यात येणार आहे. नव्या निर्णयामुळे आता पाकिस्तानातील ४६० हिंदू कुटुंबे आपल्या मृत नातेवाईकांच्या अस्थी गंगेत विसर्जित करू शकणार आहेत. , पाकिस्तानमधील अनेक हिंदू त्यांच्या नातेवाईकांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अस्थिकलश मंदिरात ठेवतात.
आत्म्याला शांती मिळेल
अशा प्रकारे ४०० हून अधिक पाकिस्तानी हिंदूंच्या अस्थी कराचीतील मंदिरे आणि स्मशानभूमीत ठेवण्यात आल्या आहेत. ‘आमच्या पूर्वजांना मृत्यूनंतर तरी मायभूमी नशिबात असावी, असे वाटायचे. अखेर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल,’ अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी हिंदू कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे.