नवी दिल्ली - विष्णु सदाशिव कोकजे यांची विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपद निवडीबाबत शनिवारी (14 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार, 273 प्रतिनिधींपैकी 132 प्रतिनिधींनी मतदान केले आहे. सकाळी 11.40 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली मतदान प्रक्रिया दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास संपली. निवडणुकीचे निकाल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारस जाहीर करण्यात आले. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंगदेखील करण्यात आले आहे.
केवळ प्रवीण तोगडिया यांची उचलबांगडी करण्याच्या उद्देशानं 52 वर्षांनंतर पहिल्यांदाच विहिंपच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक घेण्यात आली होती, असे म्हटले जात आहे. व या प्रयत्नात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यशदेखील मिळाले आहे. दरम्यान, निवडणुकीमध्ये विष्णु सदाशिवम् कोकजे यांना 192 पैकी 131 मतं मिळाली. तर प्रवीण तोगडिया यांचे समर्थक राघव रेड्डी यांना 60 मतं मिळाली असून यातील एक मतं अवैध ठरवण्यात आले.
तोगडियांनी लावला बोगस मतदारांचा आरोप 52 वर्षांत प्रथमच विहिंपमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आल्यानं ही निवडणूक विशेष अशी ठरली. सोबतच प्रवीण तोगडिया यांचे भाजपा व आरएसएससोबत असलेल्या नात्यात कटुता आल्यानं अध्यक्षपदी नेमके कोण विराजमान होणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. दरम्यान, निवडणुकीपूर्वीच विहिंपच्या मतदार यादीमध्ये 40 बोगस मतदार असल्याचा आरोप तोगडिया यांनी केला होता.
दरम्यान, डिसेंबर 2017 मध्ये तोगडिया आणि रेड्डी यांच्या पदाचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी 29 डिसेंबर 20017ला भुवनेश्वरमध्ये बैठकदेखील झाली होती. मात्र तोगडिया आणि त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालत कोकजे यांच्या नावाला विरोध केला होता.