- ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 5 - गायींची तस्करी करणा-यांना रोखण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने गोरक्षकांना 'गो तस्करांना मारा, पण हाडं तोडू नका' असा संदेश दिला आहे . विश्व हिंदू परिषदेच्या गो रक्षक विभागाने हा संदेश दिला आहे.
पश्चिम उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमधील वरिष्ठ गो रक्षकांची बैठक पार पडली. या बैठकीत गो रक्षक विभागाच्या केंद्रीय समितीचे सदस्य खेमचंद यांनी कार्यकर्त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे सदस्य नसतानाही गो रक्षणासाठी काम करणा-यांची यादी तयार करण्यास सांगितलं आहे. 'जेणेकरुन गायांची तस्करी करणा-यांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे आणि जेव्हा तस्करी करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा गो रक्षक सैनिकांचा त्यांना सामना करावा लागेल', असं खेमचंज बोलले आहेत.
खेमचंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी 'मेक इन इंडिया'वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत देशाची सुरक्षा 'मेक इन इंडिया' नाही तर गो रक्षणामुळेच होणार असल्याचा दावा केला.
'गो रक्षणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही. पण कायदा हातात घेऊ नये या मताशी मी सहमत आहे. मी अनेकदा कार्यकर्त्यांना सांगतो की 'मारा पण हाडं तोडू नका'. जर एखाद्याचं हाड तुटलं तर समस्या वाढू शकतात आणि पोलीस कारवाई होऊ शकते. अनेकांना प्रसिद्धी हवी असते म्हणून आपण मारहाण केल्याचा व्हिडिओ तयार करता, पण असं करण्याची गरज नाही', असं खेमचंद बोलले आहेत.
नंतर आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना खेमचंद यांनी 'कठीण परिस्थितींमध्ये गो रक्षकांनी स्वत:ची रक्षा करायला हवी. अनेक लोकांना आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची कल्पना नसते. आमचे अनेक कार्यकर्ते शहीद होतात', असं सांगितलं आहे.